मुंबई - मुंबईमध्ये गेले दीड वर्ष कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार सध्या कमी झाला असून सुमारे ५०० रुग्ण रोज आढळून येत आहेत. मात्र आजही मुंबईमध्ये ७३९ रुग्ण क्रिटीकल अवस्थेत आहेत. ६९९ रुग्ण व्हेंटिलेटरवर आहेत. तर १०९४ रुग्ण आयसीयूमध्ये उपचार घेत आहेत, अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली. यावरून मुंबईत नव्या रुग्णांची संख्या कमी झाल्याने कोरोना आटोक्यात आल्याचे बोलले जात असले तरी रुग्णालयात उपचार घेणाऱ्या रुग्णांची संख्या अधिक असल्याचे यावरून समोर येत आहे.
७ हजार ७१४ सक्रिय रुग्ण
मुंबईत मार्च २०२० मध्ये कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. तेव्हापासून ८ जुलैपर्यंत ७ लाख २६ हजार ८२४ रुग्णांची नोंद झाली आहे. त्यापैकी ७ लाख १ हजार १९५ रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला असून १५ हजार ५८६ रुग्णांचा मृत्यू आला आहे. एकूण मृत्यूंपैकी ५० वर्षावरील १३ हजार ३२२ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ७ हजार ७१४ सक्रिय रुग्ण आहेत.
६९९ रुग्ण व्हेंटिलेटरवर
मुंबईत पालिका, सरकारी आणि खासगी रुग्णालयात २३ हजार २७० बेडपैकी ३ हजार ८५९ बेडवर रुग्ण आहेत. ९ हजार २९२ ऑक्सिजन बेडपैकी १ हजार ५०७ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत. २ हजार ४०९ आयसीयू बेडपैकी १ हजार ९४ बेडवर रुग्ण आहेत. १ हजार ३०९ व्हेंटिलेटर बेडपैकी ६९९ बेडवर रुग्ण उपचार घेत आहेत.
७३९ रुग्ण क्रिटिकल अवस्थेत
मुंबईत ७ हजार ७१४ सक्रिय रुग्ण आहेत. त्यापैकी ३ हजार ५३४ लक्षणे नसलेले रुग्ण आहेत. ३ हजार ४४१ लक्षणे असलेले रुग्ण आहेत. ७३९ रुग्ण क्रिटिकल अवस्थेत आहेत.
९.७४ टक्के पॉझिटिव्हिटी रेट
मुंबईमध्ये कोरोना रुग्ण शोधण्यासाठी ७४ लाख ६२ हजार ५५८ चाचण्या करण्यात आल्या आहेत. त्यापैकी ७ लाख २६ हजार ८२४ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. ही आकडेवारी पाहिल्यास मुंबईतील एकूण पॉझिटिव्हिटी रेट ९.७४ टक्के इतका आहे.
परिस्थितीवर पालिकेचे लक्ष
मुंबईमध्ये कोरोनाचा प्रसार कमी झाला असला, तरी कोरोना पूर्णपणे गेलेला नाही. दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली होती. त्यात घट होऊन रोज सुमारे ५०० रुग्ण आढळून येत आहेत. आम्ही परिस्थितीवर लक्ष ठेवून आहोत. रुग्णसंख्या वाढू नये याची काळजी घेतली जात आहे. येत्या काही आठवड्यात कोरोनाची तिसरी लाट येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी पालिका सज्ज असल्याची माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.