मुंबई - 9 मार्च 2020 हा तोच दिवस होता, ज्या दिवशी राज्यात कोरोनाने प्रवेश केला आणि हा कोरोना अजून महाराष्ट्रात ठाण मांडून आहे. या एका वर्षाच्या काळात कोरोनामुळे सर्वच क्षेत्राला फटका बसला. अनेकांचे रोजगार गेले तर अनेकांना या कोरोनामुळे प्राण गमवावे लागले. अनेक उद्योगांना कोरोना नावाच्या महामारीने ग्रहण लावले.
हेही वाचा - कोरोनाच्या संसर्गाचे नियम न पाळणाऱ्यांवर उगारला कारवाईचा बडगा
25 मार्चपासून 21 दिवसांचा पहिला लॉकडाऊन
आयएमएचे माजी अध्यक्ष अविनाश भोंडवे या महामारीबद्दल म्हणतात, की एका वर्षाचा इतिहास हा अत्यंत कडवट आहे. हा आजार नेमका काय आहे, याचे निदान कसे होते, याच्यावर उपचार काय आहेत, याची कोणतीही कल्पना डॉक्टरांना नव्हती. सापडलेला पहिला रुग्ण आणि त्यानंतर या कोरोनाने संपूर्ण महाराष्ट्रात वेगाने हातपाय पसरायला सुरुवात केली. रुग्णालय रुग्णांनी भरून गेली. सरकारी रुग्णालयात रुग्णांना जागा नव्हती. 25 मार्चपासून 21 दिवसांचा पहिला लॉकडाऊन जाहीर झाला. लॉकडॉऊनमध्ये नेमके काय करावे, याची कल्पना नागरिकांना नव्हती.
हेही वाचा - कोरोनाने दगावलेल्या व्यक्तीचे मृत्यू प्रमाणपत्र तासाभरात उपलब्ध
'रुग्णसंख्या आटोक्यात येईल'
मास्क का घालावा, सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय, हात का धुवायचे याची माहिती नागरिकांना नव्हती. वैद्यकीय क्षेत्राने रुग्णांवर उपचार करायला सुरुवात केली. हळूहळू उपचार होत गेले. रुग्ण बरे होत गेले. मात्र सप्टेंबर-ऑक्टोबरच्या दरम्यान रुग्णांची संख्या प्रचंड वाढली. संप्टेबरच्या 18 तारखेला २३ हजार रुग्ण एकच दिवशी सापडले. डॉक्टर आणि प्रशासनाच्या प्रयत्नांना यश येऊन ही कोरोनाची लाट थोपवण्यात यश आले. त्यातच कोरोनावरची लस आली. लसीकरणाची मोहीम पुढील सहा महिने चालू राहणार आहे. 70 टक्के लसीकरण झाल्यानंतर भारतीयांमध्ये हार्ड इम्युनिटी येईल आणि कोरोना नष्ट होईल. सध्या मागच्या काही दिवसांपासून रुग्ण संख्या वाढत आहे. ही रुग्णसंख्या आटोक्यात येईल, असा विश्वास डॉ. भोंडवे यांनी व्यक्त केला आहे