मुंबई - खासदार नवनीत राणा ( Navneet Rana ) आणि त्यांचे पती आमदार रवी राणा ( MLA Ravi Rana ) यांनी गेल्या काही दिवसांपासून सुरू केलेल्या आंदोलनामुळे राज्यात वादळ निर्माण झाले. त्यांनी कायदा संस्था धोक्यात आणल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आणि राजद्रोहाचा गुन्हाही दाखल करण्यात आला. मात्र, न्यायालयाने राजद्रोहाचा गुन्हा नोंदवल्याबाबत नाराजी व्यक्त केली आहे. पण या सर्व घटनांच्या पार्श्वभूमीवर खासदार नवनीत राणा यांना ( Navneet Rana Health ) मान दुखी आणि मणके दुखीचा त्रास सुरू झाल्याने त्यांच्यावर लीलावती या खासगी ( Navneet Rana Admit In Lilavati Hospital ) रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
नवनीत राणा यांचा आजार? - खासदार नवनीत राणा यांची जामीनावर मुक्तता होण्याच्या एक दिवस आधीपासून त्या आपल्याला मान दुखीचा आणि मणके दुखीचा त्रास होत असल्याचे सांगत होत्या. त्यामुळे जामीन झाल्यानंतर त्यांना थेट लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आले. लीलावती रुग्णालयात त्यांच्यावर तज्ञ डॉक्टरांकडून उपचार सुरू आहेत.
राणा दांपत्याचे रुग्णालयात भावनाट्य?- लीलावती रुग्णालयात उपचार घेत असलेल्या खासदार नवनीत राणा यांना भेटण्यासाठी त्यांचे पती आमदार रवी राणा दाखल झाले आणि नवनीत राणा भाऊक झाल्या. नवनीत राणा भाऊ झाल्या असता त्यांच्या चेहऱ्यावरून हात फिरवताना आमदार रवी राणा यांचे काही फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल झाले. हे भावनाट्य म्हणजे जनतेची सहानुभूती मिळवण्यासाठी केले होते का, असा सवाल समाज माध्यमांवर उपस्थित करण्यात आला. त्यानंतर भाजपाच्या नेत्या चित्रा वाघ या रुग्णालयात जाऊन त्यांना भेटल्या तसेच भाजपाचे नेते किरीट सोमैया यांनी सुद्धा रुग्णालयात जाऊन त्यांची भेट घेतली. विशेष म्हणजे या दोन्ही भेटीचे व्हिडिओ आणि फोटो समाज माध्यमांवर आणि प्रसार माध्यमांना देण्यात आले. वास्तविक अशा पद्धतीने रुग्णालयातील फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमात अथवा प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित होण्याची ही पहिलीच घटना असावी.
अतिमहत्त्वाच्या व्यक्तींचेही रुग्णालयातील फोटो प्रसारित नाही - कोणत्याही रुग्णालयामध्ये चित्रीकरणास अथवा फोटो काढण्यास मनाई असते. रुग्णालय प्रशासनाच्या परवानगीशिवाय चित्रीकरण करणे आणि फोटो काढणे याला परवानगी दिली जात नाही. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात काही वर्षांपूर्वी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. काही महिन्यांपूर्वी राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांच्यावरही शस्त्रक्रिया करण्यात आली होती, तर गान कोकिळा लता मंगेशकर यांच्यावरही शेवटपर्यंत उपचार करण्यात आले होते. मात्र, यापैकी कुणाचेही उपचार करतानाचे फोटो कधीही प्रसारमाध्यमांवर अथवा समाज माध्यमांवर प्रसारित करण्यात आले नाहीत, असा दंडक रुग्णालय प्रशासन नेहमी पाळत असतं.
रुग्णालय प्रशासनावर प्रश्नचिन्ह- लीलावती रुग्णालयातील नवनीत राणा यांच्यावरील उपचाराचे अनेक फोटो आणि व्हिडिओज सहजरीत्या प्रसारमाध्यमांवर आणि समाज माध्यमांवर प्रसारित केले जात आहेत. नवनीत राणा यांच्या मणके दुखी आणि मान दुखीसाठी करण्यात आलेल्या एमआरआयचेही यंत्रासोबतचे फोटो वायरल करण्यात आले आहे. यामुळे रुग्णालय प्रशासनाची विश्वासार्हता आणि सुरक्षितता ही धोक्यात आली आहे. याबाबत रुग्णालय प्रशासन काय काळजी घेणार अथवा कारवाई करणार, अशी विचारणाही आता केली जाऊ लागली आहे.
नव्या युगाची गरज, मात्र रुग्णालय प्रशासन सतर्क हवे - नवनीत राणा यांना कशा प्रकारची वागणूक देऊ नये हे राज्य सरकार दाखवून देत आहे. संविधानिक पदावरील व्यक्तीसोबत अशा पद्धतीचा व्यवहार हा योग्य नाही अशी प्रतिक्रिया भाजपाच्या प्रवक्त्या आरती पूगावकर यांनी व्यक्त केली आहे. तसेच राणा दांपत्याचे फोटो आणि व्हिडिओ समाज माध्यमावर वायरल होणे हे आता सामान्य बाब आहे. ते भावूक झाल्याने ते क्षण त्यांनी समाज माध्यमावर दिले असतील मात्र जर त्यांनी उपचारा संदर्भात काही फोटो प्रसारित केले असतील तर त्याबाबत रुग्णालय प्रशासनाने सतर्कता बाळगायला हवी असे मतही पुगावकर यांनी व्यक्त केले आहे.
'ही नौटंकी कशासाठी?' - खासदार नवनीत राणा यांच्यावरील उपचाराचे फोटो आणि त्यांना भेटणाऱ्या विविध नेत्यांचे फोटो सध्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहेत. एखाद्या व्यक्तीच्या आजारपणावर लक्ष देऊन ती लवकर बरी कशी होईल याकडे त्या व्यक्तीच्या नातेवाईकांनी आणि रुग्णालयाने लक्ष देणे गरजेचे असताना अशा पद्धतीचे फोटो प्रसारित करून सहानुभूती मिळवण्याचा आणि नौटंकी करण्याचा प्रयत्न का केला जातो आहे, असा सवाल शिवसेना प्रवक्त्या आमदार प्राध्यापिका मनीषा कायंदे यांनी उपस्थित केला आहे. जर रुग्णालय प्रशासनाला खासदार राणा या महत्त्वाच्या व्यक्ती वाटत असतील तर त्यांनी त्यांच्या प्रकृतीबाबत मेडिकल बुलेटीन प्रसारित करावे, असा सल्लाही कायंदे यांनी दिला.
रुग्णालयाने राणांसाठी फोटोग्राफर नेमला आहे का? - नवनीत राणा यांचे प्रसार माध्यमात आणि समाज माध्यमात वायरल होणारे फोटो ही अजब घटना आहे. पद्धतीची घटना यापूर्वी आपण कधीही पाहिली नव्हती, त्यामुळे रुग्णालय प्रशासनाने राणा यांच्यासाठी फोटोग्राफर नेमला आहे का, असा सवाल निर्माण होतो आणि असे फोटो लावून आपण कसली पत्रकारिता करतो आहोत, असा सवाल ज्येष्ठ पत्रकार नेहा पुरव यांनी उपस्थित केला आहे.
रुग्णालय प्रशासनाचे मौन - यासंदर्भात रुग्णालय जनसंपर्क अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, त्यांनी राजकीय बाबत माहिती देण्यास असमर्थता दर्शवली. तसेच त्यांना रुग्णालयातील उपचारांचे फोटो आणि अन्य व्हिडिओ बाबत विचारले असता याबाबत आपल्याला काही माहिती नाही. आपण रुग्णालयाच्या रुग्णाच्या नातेवाईकांची बोलू शकता, असे सांगितले. मात्र रुग्णालयात फोटो घेण्याबाबत विचारले असता त्यांनी मौन बाळगले.
हेही वाचा - Inter Caste Marriage in Amravati : आंतरजातीय विवाह केला म्हणून मुलीला आई-वडिलांनी पतीच्या घरून नेले फरफटत