मुंबई - "वेळ आल्यास शिवसेनाभवन फोडू" अशा आशयाचे चिथावणीखोर वक्तव्य भारतीय जनता पक्षाचे आमदार प्रसाद लाड यांनी केले आहे. भाजप कार्यकर्ते अँग्नेलो फर्नांडिस यांच्या कार्यालयाचे माहिम येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात लाड यांनी हे वक्तव्य केले आहे. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.'भारतीय जनता पक्षाचे कार्यालय माहीममध्ये सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे शिवसेना कार्यकर्त्यांना वाटते की, भाजपाचे कार्यकर्ते शिवसेना भवन फोडतेत की काय, जर वेळ आली, तर तेही करू' असे वक्तव्य यावेळी प्रसाद लाड यांनी केले आहे. कार्यालयाच्या उद्घाटनावेळी या परिसरामध्ये पोलिसाचा बंदोबस्त देखील ठेवण्यात आला होता.
'शिवसेना भवन म्हणजे कलेक्शन सेंटर'
बाळासाहेब ठाकरे यांच्यानंतर आता शिवसेना भवन हे कलेक्शन सेंटर झाले आहे, अशी खोचक टीका भारतीय जनता पक्षाचे आमदार नितेश राणे यांनी केली आहे. तसेच, शिवसेना भवनाच्या समोर आमच्या पक्षाचे कार्यालय उघडले, तर काय बिघडले असा सवाल नितेश राणे यांनी यावेळी केला. तसेच, आम्ही अजून बाळासाहेब ठाकरे यांचे कडवट शिवसैनिक आहोत. आमची ओळख कोणी सांगू नये. मात्र, संजय राऊत हे शिवसैनिक आहेत का? असा खोचक टोला देखील यावेळी नितेश राणे यांनी संजय राऊत यांना लगावला आहे.
भाजप शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झाला होता राडा
राम मंदिर जमीन प्रकरणी झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी शिवसेनेकडून आरोप करण्यात आले होते. या आरोपानंतर 16 जुन रोजी भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते शिवसेना भवनासमोर जमा झाल्यानंतर शिवसेना कार्यकर्ते आणि भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते यांच्यामध्ये हाणामारी झाली होती. यावेळी दोन्हीकडच्या कार्यकर्त्यांवर गुन्हे देखील दाखल करण्यात आले होते.
'माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला'
'वेळ आल्यास शिवसेनाभवन फोडू' असे वक्तव्य मी केलेले नाही. माझ्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण आमदार प्रसाद लाड यांनी आपल्या ट्विटरवरून दिले आहे. भाजप कार्यकर्ते अँग्नेलो फर्नांडिस यांच्या कार्यालयाचे माहिम येथे आमदार नितेश राणे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. या कार्यक्रमात प्रसाद लाड बोलत होते. त्यावेळी 'वेळ आली तर शिवसेना भवनही फोडू' अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यानंतर प्रसार मांध्यमांत या वक्तव्यावर मोठी खलबत झाल्यानंतर लाड यांनी आपल्या ट्विटरवरुन या वक्तव्याबद्दल, आपण हे वक्तव्य केलेच नाही, आपल्या वाक्याचा विपर्यास केला गेला, असा घुमजाव केला आहे.