मुंबई - महाराष्ट्रात लस कमी प्रमाणात उपलब्ध होत असल्याने 18 ते 44 वयोगटातील लसीकरण थांबवण्याचा विचार राज्य सरकार करत असल्याचं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडून सांगण्यात आले आहे. तर 15 मे नंतर राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता आरोग्यमंत्र्यांनी वर्तवली आहे.
राज्यात लसींचा मोठा तुटवडा आहे. यातच प्रत्येक लसीकरण केंद्रावर लस घेण्यासाठी मोठी गर्दी होताना दिसते. त्यामुळे एक मेपासून केंद्र सरकारने जाहीर केलेला 18 ते 44 वयोगटात पर्यंतच्या लसीकरणाची मोहीम राज्य सरकार थांबण्याच्या विचारात असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. सध्या राज्याला खूप कमी प्रमाणात राज्याला लसी उपलब्ध होत आहेत. त्यातच केंद्र सरकारने राष्ट्रीय लसीकरण मोहीमेत 45 वयोगटाच्या वरील सर्व नागरिकांना लस देण्यास सुरुवात केली होती.त्यामुळे राष्ट्रीय लसीकरण मोहीम राज्य सरकार सुरू ठेवणार आहे. या मोहिमेअंतर्गत 45 वयोगटाच्या वरील पाच लाख लोकांना दुसरा डोस देणे आहे बाकी आहे. त्यांना वेळेवर डोस मिळावा म्हणून 18 ते 44 वयोगटात पर्यंतच्या लसीकरण मोहीम थांबवण्यात यावी आणि 45 वयोगटातील वरील नागरिकांसाठी त्या लस वापरण्यात आणाव्यात असा विचार आरोग्य विभागाकडून केला जातोय अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली.
म्यूकरमायकोसिसचा अनेकांना त्रास
कोरोना उपचाराच्या दरम्यान किंवा नंतर म्यूकरमायकोसिस या आजारांचा अनेकांना त्रास होत आहे. या आजारामुळे रुग्णांच्या नाक, कान, घसा आणि डोळे इन्फेक्शन होत असल्याचं समोर आले आहे. या सर्व रुग्णांना महात्मा ज्योतिराव फुले आरोग्य योजनेअंतर्गत उपचार केले जातील अशी माहिती राजेश टोपे यांनी दिली आहे.
हेही वाचा - कोल्हापुरात कोरोना रुग्णांना रोबो पोहोचवतोय औषधे!
रेमडेसिवीर इंजेक्शनसाठी सहा कंपन्यांकडून प्रतिसाद
रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध व्हावी, यासाठी ग्लोबल टेंडरिंग राज्य सरकारकडून केले गेले होते. या ग्लोबल टेंडरिंगला सहा कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. या सहा कंपन्यांकडून प्रत्येकी पन्नास हजार असे एकूण तीन लाख रेमडेसिवीर इंजेक्शन राज्य सरकारला उपलब्ध होणार आहेत. त्यामुळे सध्या राज्यात रेमडेसिवीरचा असलेला तुटवडा कमी होईल आणि रुग्णांना रेमडेसीविर इंजेक्शन उपलब्ध होऊन दिलासा मिळेल, असं राजेश टोपे यांनी सांगितले.
साखर कारखान्यात ऑक्सिजन निर्मिती
काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी साखर कारखान्यांमध्ये ऑक्सिजन तयार करावेत अशा प्रकारची आवाहन केले होते. त्या आवाहनाला प्रतिसाद देत उस्मानाबाद मधील धाराशिव साखर कारखान्यात प्रायोगिक तत्त्वावर ऑक्सीजन निर्मिती सुरू करण्यात आली आहे. या साखर कारखान्यातून दिवसाला 300 सिलेंडर ऑक्सिजनची निर्मिती होणार आहे. मात्र ही निर्मिती अजून वाढवून दिवसाला पाचशे सिलेंडर ऑक्सीजन निर्मिती करू शकतो अशा प्रकाराची सकारात्मकता या साखर कारखान्याने दाखवली असल्याचं राजेश टोपे यांनी सांगितले.
राज्यात लॉकडाऊन वाढवण्याची शक्यता
राज्यात 15 मेपर्यंत कडक लॉक डाऊन असल्याचे राज्य सरकारकडून जाहीर करण्यात आले होते. मात्र उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉक डाऊन वाढवण्याची शक्यता आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी वर्तवली आहे. अजूनही राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झालेला नाही. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आली असली, तरीही अजून लॉक डाऊनची आवश्यकता असल्याचं त्यांच्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे उद्या होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत लॉक संदर्भात निर्णय घेतला जाऊ शकतो. तसेच सध्या असलेल्या कडक नियमांमध्ये काही शिथिलता आणण्याची देखील शक्यता राजेश टोपे यांनी वर्तवली आहे.
हेही वाचा - विरोधी पक्षाने महाराष्ट्राला बदनाम करण्याचा विडाच उचलला आहे - विजय वडेट्टीवार