मुंबई - सारथी संस्था बंद होत असल्याच्या अफवा पसरवून भारतीय जनता पार्टी हीन राजकारण करत असल्याचा आरोप प्रदेश काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी केला आहे. 'सारथी संस्था बंद होणार नाहीच, पण अधिक मजबूत केली जाईल', असे ते म्हणाले. भाजपा नेत्यांनी सारथी संस्थेच्या उद्घाटनाला झालेल्या खर्चाची देयके थकवली असून त्या पक्षाच्या नेत्यांनी संस्था कशी चालवायची, याचे ज्ञान आम्हाला देऊ नये, असा खणखणीत इशारा त्यांनी दिलाय.
सारथी संस्थेवरून राजकारण करणाऱ्यांचा समाचार घेताना सावंत म्हणाले की, सारखी संस्था बंद पडणार असल्याच्या अफवा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस पसरवत आहेत. परंतु मराठा समाजाच्या ५० पेक्षा अधिक आंदोलकांच्या मृत्यूला त्यांचेच सरकार कारणीभूत ठरले आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या काळात या संस्थेची काय अवस्था होती हे मराठा समाजाला आठवत असल्याने ते अशा राजकारणाला बळी पडणार नाहीत. जानेवारी २०१७ पासून वीसपेक्षा अधिक महिने साधा एक कर्मचारीही या संस्थेला दिला नव्हता. फडणवीस यांनी उद्घाटन करूनही अनेक महिने कामकाज सुरू झाले नव्हते. चंद्रकांत पाटील यांनी जाहीर करूनही अनेक महिने निधीची तरतूद झाली नाही. मुख्यमंत्री म्हणून सारथीच्या कार्यालयाचे फडणवीस यांनी उद्घाटन केले पण त्यानंतर उद्घाटनाला झालेल्या खर्चाची बिले न दिल्याने थकबाकीदार कार्यालयात ठाण मांडून बसल्याची टीका सावंत यांनी केली आहे.
सारथीतून विद्यार्थ्यांना ज्या निधीचा लाभ मिळाला पाहिजे त्यातून लाखोंचे मानधन भाजपा विचारांच्या लोकांना मिळाले. मराठा आंदोलक त्यांचा राजीनामा का मागत होते. याचे उत्तर भाजपाने द्यावे. विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैशातून लाखोंच्या गाड्या घेतल्या गेल्या. याची चौकशी का नको ? मराठा समाजाची भाजपा दिशाभूल करत आहे. परंतु ते या अफवांना बळी पडणार नाहीत. सारथी बंद तर होणारच नाही पण समाजाच्या हितासाठी अधिक मजबूत केली जाईल, असे सावंत म्हणाले.
मराठा आरक्षणाला फाटा देत 'सारथी'चे गाजर
सत्तेवर येताच १०० दिवसात मराठा समाजाला आरक्षण देऊ असे आश्वासन दिलेल्या भाजपाने चार वर्षे सत्ता भोगल्यानंरही आरक्षणाचा निर्णय घेतला नव्हता. आरक्षणाला टाळटाळ करत सारथीचे गाजर फडणवीस यांनी दाखवले होते. पण त्याचा कारभार कसा सुरू होता, याची सर्वांना माहिती आहे. सारथीचा अहवाल देण्यासाठी सुद्धा १५ महिन्यांपेक्षा जास्त कालावधी लागला होता. त्यामुळे भाजपाच्या नेत्यांनी आता खोटी आणि दिशाभूल करणारी माहिती पसरवून मराठा समाजात विष कालवण्याचे उद्योग बंद करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे.