मुंबई - कोरोनामुळे मागील दोन वर्षात मुंबईकरांच्या पाणीपट्टीत पालिका प्रशासनाने वाढ केलेली नाही. त्यामुळे यंदा मुंबईकरांच्या पाणीपट्टीत ६ ते ७ टक्के वाढ केली जाणार आहे. या दरवाढीला विरोध केला जाईल, असा इशारा मुंबई काँग्रेसकडून देण्यात आला आहे. तसेच महापालिका निवडणूक तोंडावर आल्याने इतर राजकीय पक्ष याला विरोध करण्याची शक्यता आहे.
पाणीपट्टीत वाढ करण्याचा विचार - मुंबईकरांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करण्यासाठी महापालिकेला पाण्याचे स्त्रोत विकसित करणे, जलशुद्धीकरण, पाणीपुरवठा यंत्रणेत सुधारणा करणे, जुन्या व जीर्ण झालेल्या जलवाहिन्या बदलणे, गळती दुरुस्ती करणे, देखभालची कामे अशी विविध कामे केली जातात. या सर्व कामांसाठी महापालिकेला मोठा खर्च येतो. त्यामुळे या खर्चाचा विचार करून पाणीपट्टी आकारली जाते. दरवर्षी जून महिन्यात पाणी पट्टीत सुमारे ७ ते ८ टक्के वाढ केली जाते. कोरोनाच्या संकटामुळे मागील दोन वर्षात मुंबईकरांच्या पाणीपट्टीत वाढ करण्यात आली नव्हती. दरवर्षी जूनमध्ये होणारी पाणीपट्टीतील वाढ कोरोना काळात झाली नव्हती. त्यामुळे यंदा पाणीपट्टीत वाढ करण्याचा विचार पालिकेकडून केला जातो आहे.
पाणी पट्टीचे सध्याचे दर - भातसा, तानसा, मध्य वैतरणा, अप्पर वैतरणा मोडक सागर, विहार व तुळशी या सातही धरणांतून दीड कोटी मुंबईकरांना दररोज ३ हजार ८०० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा करण्यात येतो. प्रचलित धोरणानुसार, नियोजनबद्ध इमारतीतील रहिवाशांना प्रतिदिन प्रतिव्यक्त १३५ लिटर या दराने पाणीपुरवठा केला जातो. इमारतीतील रहिवाशांसाठी सध्याचे दर ५.२२ रुपये प्रति हजार लिटर इतके आहेत.
काँग्रेस विरोध करणार - मुंबईकरांना आधीच महागाईच्या झळा सहन कराव्या लागत आहे. त्यात आणखी एक दरवाढ मुंबई महापालिका प्रशासनाकडून मुंबईकरांवर लादण्यात येत आहे. या दरवाढीला मुंबई काँग्रेसकडून विरोध करण्यात येईल, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेतील माजी विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी दिली आहे.