मुंबई - उद्धव ठाकरे यांनी गुरुवारी मुख्यमंत्री पदाची शिवाजी पार्कवर लाखोंच्या समुदयासमोर शपथ घेतली. त्यानंतरही महाविकास आघाडीतील सत्ता पदाचा घोळ अद्याप संपलेला नाही. आता राष्ट्रवादीकडे उपमुख्यमंत्री पदाऐवजी विधानसभेचे अध्यक्ष पद, तर काँग्रेसला अध्यक्ष पदाऐवजी राज्याचे उपमुख्यमंत्री पद दिले जाणार असल्याची माहिती मिळत आहे. याबाबत काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांनी हा निर्णय वरिष्ठ पातळीवर होत असतो. लवकरच याबाबत स्पष्टता येईल, असे सांगण्यात येत आहे.
हेही वाचा - विधानपरिषदेत रंगणार ठाकरे विरूद्ध राणे सामना? भाजपचा नवा प्लॅन
दरम्यान, शिवाजी पार्कवरील शपथविधी सोहळ्यात राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्री पदाची शपथ देण्यात येणार असल्याची जोरदार चर्चा होती. मात्र, राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी ऐनवेळी उपमुख्यमंत्री पदाच्या निर्णयावर आक्षेप घेतला असल्याचे राजकीय वर्तुळात चर्चा आहे. त्यानंतर राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी अजित पवार शपथ ग्रहण करणार नसल्याचे स्पष्ट केले. तर, शुक्रवारीही हाच गोंधळ कायम होता.
हेही वाचा - पहिल्या मंत्रीमंडळ बैठकीत लपून-छपून बहुमत सिद्ध करण्यावर चर्चा - फडणवीस
अजित पवार हे धनंजय मुंडे यांच्या बंगल्यावर सुमारे दोन तास ठाण मांडून समर्थक कार्यकर्त्यांची आणि आमदारांची भेट घेतल होते. तसेच राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी ही दोनदा त्यांची भेट घेतली. यानंतर राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या सत्ता पदात फेरबदल केल्याचे सांगण्यात येत आहे. राष्ट्रवादीला विधानसभा अध्यक्ष पद तर, काँग्रेसला उपमुख्यमंत्री पद देण्यात आले असल्याची माहिती मिळत असून अद्याप अधिकृत माहिती दोन्ही पक्षांनी दिलेली नाही.