मुंबई - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 14 मार्चला होणारी राज्यसेवा पूर्वपरीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यातील वाढत्या कोरोना रुग्णसंख्येचा विचार करता हा निर्णय घेण्यात आला आल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र, आयोगाच्या या निर्णयाविरोधात पुण्यातील विद्यार्थी चांगलेच आक्रमक झाले आहेत. दुसरीकडे सत्ताधारी पक्षाचे आमदार रोहित पवार यांनीही या निर्णयावर फेर विचार व्हावा यासाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या कडे मागणी करणार आल्याच ट्विटच्या मद्यामातून सांगितले आहे.
युवक काँग्रेसचे नेते सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयावर संताप व्यक्त केला आहे. “एमपीएससीची परीक्षा अचनाकपणे पुढे ढकलण्याचा जो निर्णय आज झाला आहे. त्याचा मी जाहीर निषेध करतो. कोरोनाचे संकट कितीही मोठे असले तरीही अशा पद्धतीने अचानकपणे परीक्षा पुढे ढकलून काय साध्य होणार आहे? या निर्णयावर तातडीने फेरविचार झालाच पाहिजे”, अशा शब्दात सत्यजित तांबे यांनी आयोगाच्या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. मात्र, विद्यार्थ्यांचा वाढता विरोध पाहता राज्याचे मुख्यसचिव सीताराम कुंटे या निर्णया संबंधी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत असून विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी लवकरात लवकर निर्णय घेण्यात येणार असल्याची माहिती समोर येत आहे.
या कारणांमुळे परीक्षा पुढे ढकलली -
गेल्या काही दिवसांपासून राज्यातील काही जिल्हात कोरोना विषाणूने पुन्हा एकदा डोके वर काढले आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून जिल्ह्यानुसार लॉकडाऊन आणि प्रवासावर निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे शासनाच्या आपत्ती व्यवस्थापन प्रभाग, मदत व पुनर्वसन विभागाकडून दिनांक १० मार्च, २०२१ च्या पत्राद्वारे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला पूर्व परीक्षा घेणे योग्य नसल्याचे सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे राज्यभरातील स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झालेले आहे.