मुंबई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना यूपीए आघाडीचे अध्यक्षपद देण्याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा आहे. यासंबंधी आघाडीतील काही नेत्यांनी संकेत देखील दिले आहेत. मात्र दिल्लीपासून मुंबईपर्यंत राहुल गांधी यांना संपवण्यासाठी जे अभियान सुरू आहे, त्याचाच हा भाग असल्याचे काँग्रेस नेते संजय निरुपम यांनी म्हटले आहे. हे राहुल गांधी यांचे काँग्रेस पक्षातील अस्तित्व संपवण्यासाठी केलेले षडयंत्र असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
राहुल गांधी यांच्याविरोधातील अभियानाला पाठिंबा देण्यासाठी 23 जणांच्या स्वाक्षऱ्या असलेले पत्र दिल्लीत पोहोचले आहे. यानंतर राहुल गांधी यांच्या नेतृत्त्वात कमी शोधण्याचा प्रयत्न करण्यात आला. त्यांच्यात सातत्याचा अभाव असल्याचे काही नेत्यांनी म्हटले. मात्र हा देशातील काँग्रेस मिटवण्याचा मोठा प्लॅन आहे, असे संजय निरुपम यांनी म्हटले आहे.
शरद पवार होणार युपीएचे अध्यक्ष? राजकीय वर्तुळात चर्चांना पुन्हा उधाण
देशाच्या राजकारणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव नेहमीच आघाडीवर राहिले आहे. काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन राष्ट्रवादी काँग्रेस हा स्वतंत्र पक्ष स्थापन करणारे शरद पवार आता युपीएचे (संयुक्त पुरोगामी आघाडी) अध्यक्ष होणार असल्याची चर्चा देशाच्या राजकारणात रंगू लागली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी देखील शरद पवारांमध्ये देशाचे नेृत्तव करण्याची क्षमता असल्याचे वक्तव्य केले आहे. यापूर्वीही शरद पवरांनी केंद्रीय पातळीवरती विरोधी पक्षाचे नेतृत्त्व करावे, अशी मागणी विविध प्रादेशिक पक्षांनी केली होती. त्याची चर्चा पवार यांच्या राष्ट्रपतींच्या भेटीनंतर पुन्हा एकदा सुरू झाली आहे.
"पवार युपीएचे अध्यक्ष झालेले आम्हाला आवडेल; तसा प्रस्ताव आल्यास आम्ही पाठिंबा देऊ"
यूपीएच्या अध्यक्षपदी शरद पवारांची नियुक्ती करण्याबाबतचा प्रस्ताव पुढे आल्यास शिवसेना त्याला पाठिंबा देईल, असे शिवसेनेचे खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही पवारांचे हितचिंतक असून ते अध्यक्ष होणार असतील तर आम्हाला आनंदच होईल, असेही ते यावेळी म्हणाले. मात्र, सध्या तरी तसा कोणताही प्रस्ताव नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
पवारांच्या यूपीएचे अध्यक्ष होण्याच्या चर्चा सध्या सुरू आहेत. मात्र हे वृत्त स्वतः पवारांनी फेटाळले असल्याचे राऊत यांनी सांगितले. शरद पवार हे देशाचे मोठे नेते आहेत. त्यांच्या नेतृत्त्वाखाली आम्ही सर्व काम करत आहोत. पवारांना युपीएचे अध्यक्ष बनवण्याचा कोणताही प्रस्ताव आल्यास त्यास शिवसेना पाठिंबा देईल, असेही त्यांनी सांगितले. आम्ही त्यांचे हितचिंतक असून ते अध्यक्ष झालेले आम्हाला आवडेल, असेही राऊत यांनी स्पष्ट केले.
यूपीएला मजबूत करण्यासाठी निर्यण घ्यावा लागेल.
देशातील सध्याची स्थिती पहाता सर्व विरोधीपक्षांनी एकत्र येण्याची गरज आहे. त्यासाठी काही ठोस निर्णयही घ्यावे लागतील. काँग्रेस हा राष्ट्रीय आणि मोठा पक्ष आहे. मात्र, त्यांना लोकसभेत विरोधीपक्षनेतेपदही मिळवता आले नाही हेही सत्य आहे. त्यामुळे केंद्रातही महाराष्ट्रासारखी आघाडी बनणे गरजेचे आहे. त्याचे नेतृत्त्व कोण करणार हाही प्रश्न आहेच, पण सर्वांनी एकत्र येत याबाबत निर्णय घेतला पाहिजे असेही ते म्हणाले.
राहुल यांच्याकडे सातत्याची कमी...शरद पवारांची नवी खेळी?
देशाचे नेतृत्त्व करण्यासाठी राहुल गांधी यांच्याकडे सातत्याची कमतरता असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी व्यक्त केले होते. पुण्यातील एका आयोजित कार्यक्रमात याबाबत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना पवारांनी राहुल गांधींच्या नेतृत्त्व गुणांवर नाराजी व्यक्त केल्याचे दिसले. मात्र, त्यांनी बराक ओबामा यांनी राहुल यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याला बगल दिली.
यानंतर आता शरद पवार यूपीएचे नवे अध्यक्ष असणार की नाही, याबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात देशात नव्या नेतृत्त्वाखाली यूपीए संघटित होणार का, हे पाहणं औत्सुक्याचं असणार आहे.