मुंबई - नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचा खमंग ढोकळा खाऊन तुमचं मांजर झालं. कितीही डरकाळ्या फोडल्या तरी म्याव-म्याव, असाच आवाज येत असल्याची टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे. एवढेच नाही, तर उद्धव आजोबा तोंड सांभाळून बोला, असा इशाराही सावंतांनी ठाकरेंना दिला आहे.
राहुल गांधींसारख्या नेभळट लोकांच्या हाती आपला देश द्यायचा का ? कन्हैय्या, दाऊद यांच्यासारख्यांना वाचवण्यासाठी राहुल गांधींना देशद्रोहाचे कलम रद्द करायचे असल्याची टीका उद्धव ठाकरे यांनी केली होती. देशद्रोह्यांना फासावर लटकवणारे सरकार हवे असेल, तर महायुतीला मतदान करा,असे आवाहनही उद्धव ठाकरे यांनी केले होते. उद्धव ठाकरेंच्या या टीकेला सावंत यांनी प्रत्युत्तर दिले.
यावेळी बोलताना सावंत म्हणाले, मोदी- शाहांच्या चरणी उद्धव ठाकरेंनी साष्टांग दंडवत घातले आहे. हा चेहरा आता लोकांना पटणार नाही. धर्मांध शक्तिविरोधात राहुल गांधी लढत आहेत. शिवसेनेचा खरा चेहरा जनताच उघडा करील, असेही सावंत यावेळी म्हणाले.