मुंबई - उत्तर प्रदेशातील लखीमपूरमध्ये भाजपा नेत्याच्या मुलाने शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडल्यानंतर राज्यात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनाही लखीमपूरमधील पीडित कुटुंबांना भेटण्यास रोखण्यात आले आहे. अटक करून त्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले आहे. उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या या कारवाईच्या निषेधार्थ काँग्रेस उद्यापासून देशभर जेलभरो आंदोलन करेल असा, इशारा महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी आज पत्रकार परिषदेत दिला.
हेही वाचा - केंद्राची शेतकऱ्यांविरुद्ध 'दंगल'; राज्यमंत्री बच्चू कडूंची यांची टीका
'भाजपाला लोक जागा दाखवतील'
4 ऑक्टोबर 1977ला इंदिरा गांधी यांना अटक झाली होती. अशाच प्रकारची पुनरावृत्ती 4 तारखेला पाहिला मिळाली. प्रियांका गांधी यांना अटक केली असून पुन्हा एकदा हुकूमशाही या देशात सुरू झाली आहे. जनता पार्टीची यापूर्वी जी परिस्थिती होती, तशीच परिस्थिती आता भाजपाच्या सरकारची होणार आहे. शेतकऱ्यांना चिरडणाऱ्या भाजपाला लोक त्यांची जागा दाखवतील. मात्र, प्रियंका गांधी यांना तातडीने सोडले नाही, तर उद्यापासून राज्यात जेलभरो आंदोलन करू, केंद्र सरकार याला सर्वस्व जबाबदारी राहील, असे पटोले म्हणाले.
'गांधी कुटुंबाला घाबरले'
केंद्र सरकारच्या काळ्या कायद्याविरोधात देश पेटलेला आहे. उत्तर प्रदेशात भाजपाचे मुख्यमंत्री खट्टर शेतकऱ्यांविरोधात विधाने करीत आहेत. शेतकऱ्यांना लाठ्या मारण्यास सांगत आहेत, हा प्रकार गंभीर आहे. छत्तीसगडचे मुख्यमंत्री उत्तर प्रदेशला जाणार होते. त्यांनाही विमानतळावर माघारी परतावे लागले. केंद्र आणि राज्यातील भाजपा सरकार गांधी कुटुंबाला घाबरल्याचे पटोले यांनी सांगितले.
हेही वाचा - लखीमपूर खीरी प्रकरण : उपराजधानीत कॉंग्रेसकडून उत्तर प्रदेश सरकारचा निषेध
बच्चू कडूंबाबत मौन
अकोला बँक निवडणुकीवर बोलण्यास पटोले यांनी नकार दिला. कडू हे अपक्ष आमदार असून ते शिवसेनेच्या कोट्यातून मंत्री झाले आहेत. आम्ही जास्त त्यावर बोलणार नाही. त्यांचा निर्णय ते स्वतः घेतात, असे सांगत पटोले यांनी बाजू मारली.
'काँग्रेस आघाडीवर'
राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या पोटनिवडणुकीचा आतापर्यंत जो कल आपण पाहतोय, त्यात भाजपा मागे पडला आहे. अजून निकाल यायला वेळ आहेत. पण काँग्रेस बऱ्याच जागेवर आघाडीवर असल्याचे दिसते, असा दावा पटोले यांनी केला.