मुंबई - कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात २२ ते २५ जुलै दरम्यान झालेल्या अतिवृष्टीने तळईसह इतर गावात दरडी कोसळून मोठी जीवीत व वित्तहानी झाली आहे. शेतकरी, व्यावसायीक, दुकानदार, सर्वसामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे. राज्य शासनाने मदत जाहीर केलेली असली तरी झालेले नुकसान पाहता वाढीव मदत देण्याची गरज आहे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.

काय आहे पत्रात?
नाना पटोले यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवले असून, मुख्यमंत्र्यांनी पूरग्रस्त भागाची पाहणी केल्यानंतर ३ ऑगस्टच्या मंत्रिमंडळ बैठकीत मदत जाहीर केलेली आहे. या मदतीचा शासन आदेश अद्याप निर्गमित झाला नसल्याची आपली माहिती आहे. मी स्वतः महाड, चिपळूण या अतिवृष्टीग्रस्त भागाचा ४ व ५ ऑगस्ट रोजी पाहणी दौरा करून स्थानिकांशी संवादही साधला आहे. अतिवृष्टीमुळे शेती, मच्छीमार व्यावसायीक, दुकानदार, घरांची मोठी हानी झालेली आहे. सरकारने मदत जाहीर केली असली तरी त्यात वाढ करण्याची गरज आहे. पीक विमा कंपन्यांकडून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यास दिरंगाई केली जात आहे. यासंदर्भात विमा कंपन्यांच्या अधिकाऱ्यांशी बैठक घेऊन तातडीने विना विलंब नुकसान भरपाई मिळावी यासाठी निर्देश द्यावेत. पशुधन, शेती अवजारे, बियाणे मोफत द्यावेत. वाहून व खरडून गेलेल्या शेतीची तातडीने दुरुस्ती करावी. व्यावसायीकांनाही विमा कंपन्यांकडून नुकसान भरपाई मिळण्यास सहकार्य मिळत नाही. या व्यावसायिकांना आयकर भरण्यासाठी सवलत वा मुदतवाढ मिळावी. शक्य असल्यास जीएसटी माफ करावा किंवा कर भरण्यासाठी मुदतवाढ वा सवलत द्यावी. या व्यावसायीकांना राष्ट्रीयकृत बँका, सहकारी बँकांकडून २ टक्के दराने कर्जपुरवठा मंजुर करावा, मंजुर केलेल्या कर्जावरील व्याजाचा बोजा शक्य असल्यास शासनाने भरावा. टपरीधारकांना वाढीव अर्थसहाय्य मिळावे, दुधाळ जनावरे, मेंढी, बकरी, गाढव, कुक्कुटपालन पक्षी यांच्याकरीता मंजूर केलेल्या प्रति कुटुंब नुकसान भरपाईमध्ये वाढ करावी. मत्सबोटी व जाळीसाठी मंजूर केलेल्या अर्थसहाय्यामध्ये वाढ करावी, बाधित कुटुंबांना कपडे, भांडी, घरगुती वस्तु यासाठी वाढीव सानुग्रह अनुदान मंजूर करावे. घरांच्या पडझडीबाबत शासनाने मंजूर केलेल्या मदतीमध्येही वाढ करावी, अशी मागणी पत्रातून नाना पटोले यांनी केली आहे.
महाड व चिपळूण भागातील गंधारी, सावित्री, वशिष्टी नद्यांचे खोलीकरण करणे, नैसर्गिक चक्रीवादळे, अतिवृष्टी, महापूर, डोंगराचे भूस्खलन यावर कायमस्वरुपी उपाययोजना करण्यासाठी महाराष्ट्र राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाची बैठक घ्यावी. गंधारी, विशिष्ठी, सावित्री नद्यांच्या खोलीकरण व नदी पात्रात सुधारणा करण्याचे व पूर संरक्षक भिंती बांधण्यासाठी नेमलेल्या समितीमध्ये पाटबंधारे विभागाअंतर्गत असलेल्या मेरी, जलसंधारण विभागाअंतर्गत असलेल्या नेरी या संस्थांचा सहभाग घ्यावा, अशा मागण्या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पटोले यांनी केल्या आहेत.
हेही वाचा -मराठा आरक्षण, पूर, गोल्डन बॉय, राज्यपाल दौरा... मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी संवाद साधणार