मुंबई - कोल्हापूर, सांगली व इतर भागात आलेल्या महापूराला राष्ट्रीय आपत्ती घोषीत करावी, अशी मागणी काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली आहे. तसेच या आपत्तीला राष्ट्रीय आपत्ती निवारण प्राधिकरणाच्या मार्गदर्शक नियमावलीनुसार अत्यंत गंभीर अशी लेव्हल ३ दर्जाची आपत्ती घोषित करण्यात यावी, या मागणीचे पत्रही मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आले आहे. केंद्र सरकारला यातून मदत करणे बंधनकारक राहील, असे सचिन सावंत यांनी म्हटले आहे.
राज्यातील सांगली, सातारा, कोल्हापूर, कोकण व विदर्भातील गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टी होऊन अपरिमित हानी झालेली आहे. कृष्णा नदीच्या खोऱ्यात महापुराने थैमान घातले असून अनेक भागात मागील चार दिवसापासून पुरपातळी अद्यापही कमी झालेली नाही. आजही या परिसरातील हजारो कुटूंबे पुरग्रस्त भागात मदतविना अडकलेली आहेत. त्यामुळे राज्यावर आलेले संकट गंभीर राष्ट्रीय आपत्ती म्हणून घोषीत करावी, अशी मागणी केली.
कोल्हापुरातील २३९ गावांतील सुमारे १ लाख १२ हजार लोक तसेच सांगली जिल्ह्यातील १ लाख, ३५ हजार लोक स्थलांतरित झाले आहेत. अद्यापही हजारो कुटूंबिय पुरग्रस्त भागात अडकलेले असून मदतीच्या प्रतिक्षेत आहेत. या पुरामुळे राज्यातील सुमारे ६८ हजार खरीप क्षेत्र नष्ट झाले आहे. पुरामुळे घरे, दुकाने, शासकीय इमारती, शाळा, बाजारपेठा यांचे अतोनात नुकसान झालेले आहे.
तसेच पुरात जनावरांचे मृत्यु झाल्याने मृत जनावरांच्या शरीराच्या विघटनामुळे परिसरात महामारी, साथीच्या रोंगाचा प्रार्दुभाव होण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे. या परिसरातील स्थिती सर्वसामान्य होवून जनजीवन सुरळीत होण्यासाठी काही आठवड्यांचा कालावधी लागू शकेल. या अभुतपुर्व पूर परिस्थितीमुळे झालेल्या शेती व जनावरांच्या नुकसानामुळे त्याभागात तसेच आसपासच्या परिसरात अन्न, धान्य, भाजीपाला, दुध, इंधन, औषधांचा तुटवडा निर्माण होणार आहे.
राज्यातील विविध प्रकारच्या आपत्ती निवारणासाठी सद्य:स्थिती असलेली आपत्ती निवारण यंत्रणा ही जागतिक दर्जाची करण्यासाठी तातडीने कार्यवाही करावी, पूरग्रस्त परिसरातील स्थिती सर्वसामान्य होवून जनजीवन सुरळीत होण्यासाठी विशेष कृती दले तयार करुन विशेष निधी उपलब्ध करुन द्यावा अशा मागण्या मुख्यमंत्र्यांना पाठवण्यात आलेल्या पत्रात करण्यात आल्या आहेत. केंद्र सरकारला यातून मदत करणं बंधनकारक राहील,असेही या पत्रात म्हटले आहे.