मुंबई - वाढती महागाई आणि इंधन दराच्या विरोधात काँग्रेसने सायकल मार्च काढत राज्यपालांना निवेदन दिले. या निवेदनातून मराठा आणि ओबीसी आरक्षणाचा प्रश्न केंद्र सरकारने लवकरात सोडवावा, अशी विनंतीही करण्यात आली आहे.
देशात महागाईचा आगडोंब उठला आहे. त्यातच रोज इंधनाचे दर वाढत असल्याने सामान्य माणसाचे महागाईने कंबरडे मोडले आहे. याच्याविरोधात आज (गुरूवार) काँग्रेसने सायकल मार्च काढत राजभवनामध्ये जाऊन राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांना वाढत्या महागाईच्या विरोधात निवेदन दिले. मुंबईमधील कमला नेहरू उद्यान ते राजभवन असा सायकलचा प्रवास करत वाढती महागाई आणि इंधन दरवाढीचा निषेध काँग्रेस नेत्यांनी केला. यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप, माजी मंत्री असलम शेख यांच्यासहित काँग्रेसचे काही नेते आणि कार्यकर्ते उपस्थित होते. या सर्वांनी राजभवनापर्यंत सायकल प्रवास करत राज्यपालांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले.
'ओबीसी आणि मराठा आरक्षणाबाबत केंद्र सरकारने भूमिका घ्यावी'
राज्यपालांना भेटून महागाई तसेच इंधन दरवाढीविरोधात निवेदन देत असताना या निवेदनात मराठा आरक्षण आणि ओबीसी समाजाचे रद्द झालेले राजकीय आरक्षणाचा प्रश्न देखील काँग्रेसकडून उपस्थित करण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या चुकीच्या भूमिकेमुळे मराठा समाज आणि ओबीसी समाजाचे आरक्षण रद्द झाल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. त्यामुळे केंद्र सरकारने याबाबत लवकरात लवकर भूमिका घेऊन मराठा आणि ओबीसी समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी आरक्षणाचा मार्ग मोकळा करण्याची विनंती काँग्रेसकडून करण्यात आली आहे. तसेच केंद्र सरकारकडून राज्याला लसीचा पुरवठा हा कमी होत असल्याने अनेक वेळा राज्यात लसीकरण थांबते. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज्याला लसीकरण याचा पुरवठा योग्य रित्या व्हावा, अशी मागणी या निवेदनातून काँग्रेसकडून करण्यात आली. तर केंद्राने केलेले नवीन कृषी कायदे हे शेतकरी विरोधी आहेत. हे कायदे केंद्र सरकारने रद्द करावे, अशी मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे.
हेही वाचा -शरद पवार हे महाविकास आघाडीचे रिमोट कंट्रोल - नाना पटोले