मुंबई - कॉन्फेडरेशन ऑफ इंडियन अल्कोहोलिक बेवरेज कंपन्यांनी (सीआयएबीसी) मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना राज्यभरात टप्प्याटप्प्याने मद्यविक्री व्यवसाय पुन्हा सुरू करण्याची मागणी केली आहे. यासाठी संबंधित संघटनेने मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिले आहे. अनेक राज्यांसाठी उत्पादन शुल्क धोरण संपुष्टात येत आहे. या तारखेपूर्वी कंपन्यांनी ऑपरेशन चालू ठेवण्यासाठी अनेक वैधानिक गरजांची पूर्तता करणे आवश्यक असल्याचे सीआयएबीसीने मुख्यमंत्र्यांना पाठवलेल्या पत्रात म्हटले आहे.
अल्कोहोलयुक्त पेयांवरील कर राज्य सरकारच्या कमाईचा एक महत्त्वाचा स्रोत आहे. यामुळे राज्यांना मोठ्या प्रमाणात महसूल मिळतो. मात्र आता लॉकडाऊनमुळे सर्वत्र संचारबंदी आहे. या काळात मद्यविक्री पूर्णत: बंद आहे. त्यामुळे महसूलात देखील घट झाल्याचे या पत्रात नमूद करण्यात आले. यामुळे टप्प्या टप्प्याने राज्यभरातील दारूबंदी उठवावी, अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे.
संबंधित पत्रात पुढील मुद्दे अंतर्भूत आहेत...
- 31 मार्च 2020 रोजी कालबाह्य झालेल्या किरकोळ परवान्यांना 30 जून 2020 पर्यंत मुदतवाढ देण्यात यावी. सीओव्हीआयडी 19 हॉटस्पॉट्सच्या बाहेरील दुकानांना पुढील टप्प्याटप्प्याने उघडण्याची परवानगी दिली जावी.
- 2019-20 मध्ये खरेदी केलेली ऑर्डर विकण्याची परवानगी देण्यात यावी.
- कोणत्याही दुकानात वॉक-इन शॉप असल्यास किंवा एकाच विंडो शॉप असल्यास 'एका वेळी एक ग्राहक' या तत्वावावर परवानगी द्यावी. सोशल डिस्टन्ससाठी सर्व वाईन शॉप्सबाहेर ठराविक अंतरावर चौकोन आखण्यात येणार आहेत.
- आवश्यक असणारी तपासणी करून घरपोच मद्य डिलीव्हरीची परवानगी द्यावी.
- ऑनलाइन अॅप्लिकेशनद्वारे दुकानांना होम डिलीव्हरीसाठी नोंदणी करण्यास मुभा देण्यात यावी.