मुंबई - उपनगर अंधेरी येथील चिनाय आणि एमव्हीएलयू कॉलेजवर प्रशासक नेमण्याच्या मागणीवरून वाद विकोपाला गेल्याने मुंबईचे माजी उपमहापौर राजेश शर्मा यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्या विरोधात पक्षश्रेष्ठींकडे तक्रार केली आहे. याबाबत त्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी, खासदार राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांच्याकडे दाद मागितली आहे.
शर्मा यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले
अंधेरी येथील चिनाय आणि एमव्हीएलयू कॉलेज बंद करण्याचा घाट प्रशासनाने घातला आहे. हे प्रकरण सर्वोच्च न्यायालयातही गेले असून कॉलेज बंद करू नयेत असे आदेश सर्वोच्च न्यायालय दिले आहेत. मात्र, त्यानंतरही कॉलेज प्रशासन कॉलेज बंद करण्यावर ठाम असल्याने या प्रकरणी माजी महापौर आणि महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस राजेश शर्मा यांनी शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांच्याकडे दाद मागितली होती. मात्र, या प्रश्नाकडे राज्य सरकार कानाडोळा करत असल्याचा आरोप करत शर्मा यांनी पक्षश्रेष्ठींना पत्र पाठवले आहे.
कॉलेजपेक्षा पेक्षा भूखंडावर नजर
शिक्षण मंत्री या कॉलेजवर प्रशासक का नेमत नाहीत याबद्दल या पत्रात शर्मा यांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. या कॉलेजची सुमारे ८ हजाराहून अधिक विद्यार्थी क्षमता आहे. तसेच, येथे ज्युनियर आणि डिग्री कॉलेज आहे. जवळपास १५० शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी असून कॉलेज बंद करण्याचा घाट घातला जात असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले आहे. हे कॉलेज अंधेरी स्थानकापासून हाकेच्या अंतरावर असल्याने अनेक कंपन्यांच्या त्या जागेवर डोळा आहे. या भूखंडाची किंमत दोन हजार कोटींच्या घरात असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. त्यामुळे याप्रश्नी आपण हस्तक्षेप करून या कॉलेजात प्रशासक नेमण्याचे आदेश वर्षा गायकवाड यांना द्यावेत, अशी मागणी शर्मा यांनी केली आहे.
हेही वाचा - 'आयर्न लेडी' इंदिरा गांधींचा स्मृतीदिन : काँग्रेस नेते राहुल गांधींनी शक्तिस्थळी केलं अभिवादन