मुंबई - कम्युनिटी हेल्थ वर्कर्स मुंबईमध्ये ( Mumbai Community Health Worker ) तळागाळात जाऊन आरोग्य विभागाचे काम करतात. मात्र, त्यांना किमान वेतन आणि सामान्य अशा सुविधा दिल्या जात नाहीत. याबाबत गेले कित्येक वर्षे मागणी करूनही या कर्मचाऱ्यांच्या मागण्यांकडे महापालिकेकडून ( Mumbai Municipal Corporation ) दुर्लक्ष केले जात असल्याने, आज (सोमवारी) संपावर जाण्याचा निर्णय घेतला ( Community Health Workers Strike ) आहे.
प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन
कोरोना काळातही जीव धोक्यात घालून सेवा देणाऱ्या पालिकेतील चार हजार कम्युनिटी हेल्थ वर्कर्स सोमवारी संपावर जाण्याचा निर्णय घेतला आहे. किमान वेतन कायद्यांतर्गत वेतन व गरोदरपणातील रजेचा पगार, भविष्य निर्वाह निधी, कायम स्वरूपी सेवेत समाविष्ट करणे, कोविड भत्ता आदी मागण्यांकडे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती आरोग्य कर्मचारी संघटनेचे प्रकाश देवदास यांनी दिली.
आंदोलनाचा इशारा
मुंबई महापालिकेत सुमारे चार हजार कम्युनिटी हेल्थ वर्कर आहेत. घरोघरी जाऊन सेवा देणाऱ्या या हेल्थ वर्कर आवश्यक सेवा- सुविधांपासून वंचित आहेत. हक्काच्या मागण्यांबाबत सातत्याने प्रशासनाचे लक्ष वेधूनही दुर्लक्ष केले जाते आहे. मागील दोन वर्षांपासून कोविडच्या काळात जीव धोक्यात घालून त्यांना काम करावे लागते आहे. मात्र त्यांना आवश्यक सुविधा मिळत नसल्याने त्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागते आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने आता आंदोलनाशिवाय पर्याय राहिलेला नाही. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी संपावर जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे. याकडे दुर्लक्ष झाल्यास बेमुदत संपावर जाण्याचा इशारा संघटनेचे प्रकाश देवदास यांनी दिला आहे.