मुंबई- एका महिन्यावर पावसाळा येऊन ठेपला आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाची मान्सूनपूर्व तयारी सुरू झाली आहे. नाले सफाई, पाणी उपसण्यासाठी पंपाची व्यवस्था, रेल्वे रूळ मार्ग सफाई, ओव्हर हेड वायरची देखभाल, झाडांच्या फांद्याची छाटणी, अशी कामे रेल्वे प्रशासनाकडून करण्यात येत आहेत. तसेच पावसाळ्यात रेल्वे गाड्या घाट विभागातून सुरळीत चालाव्यात यासाठी देखील रेल्वे प्रशासनाकडून तयारी करण्यात आली आहे. ज्यामध्ये घाटात लोखंडी जाळ्या लावणे, सिग्नल यंत्रणा दुरुस्त करणे, विद्युत दिवे दुरुस्त करणे अशी कामे वेगात सुरू आहेत. ही सर्व कामे ३१ मेपर्यंत पूर्ण करण्यात येणार आहे.
पाणी उपसा करण्यासाठी 152 पंपाची व्यवस्था
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, सीएसएमटी-ठाणे, ठाणे-कल्याण, सीएसएमटी-मानखुर्द, पनवेल-रोहा या लगतच्या रेल्वे भागात पाणी साचण्याचे प्रमाण जास्त प्रमाणात असते. त्यामुळे यंदा जोरदार पावसात पाण्याचा जलद गतीने निचरा होण्यासाठी हेवी ड्युटी डिझेल व इलेक्ट्रिक पंप उपलब्ध करुन देण्याची योजना आखली आहे. जेणेकरून पावसाळ्यात रेल्वे सेवा खंडित होणार नाही. पाणी साचण्याच्या ठिकाणी एकूण १५२ पंप बसविण्यात आले आहेत. मागील वर्षी १४३ पंप बसविण्यात आले होते. सर्वाधिक पंप हे सीएसएमटी ते ठाणे दरम्यान असून एकूण ७५ पंप लावण्यात आले आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
कमकुवत दरडी हटवण्याचे काम
मध्य रेल्वेचे सर्वाधिक कठीण काम घाट भागात सुरू असते. बोर घाटाची लांबी २८ किमी असून यामध्ये सुमारे ५८ बोगदे आहेत. तर, थळ घाटाची लांबी १४ किमी असून यामध्ये सुमारे १८ बोगदे आहेत. यामधील कमकुवत दरडींचे निरीक्षण करून झाले आहे. तर, यापैकी ४० टक्के दरडी काढण्याचे काम झाले आहे. उर्वरित इतर कामे मे अखेरीपर्यंत करण्यात येणार आहेत, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली. घाट भागातील कामाची तयारी डिसेंबर 2020 मध्ये झाली. त्यानंतर कामाचा अंदाज, निविदा प्रक्रिया पूर्ण करणे अशी कामे करण्यात आली.
372 नाले सफाईचे काम पूर्ण
मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात १ हजार ३७ नाल्यांपैकी ३७२ नाले सफाईचे काम पूर्ण झाले आहे. तर ५९८ झाडांपैकी १५४ झाडांच्या छाटणीचे काम झाले आहे. तसेच घाट विभागात असलेले कमकुवत ६०३ दरडींचे निरीक्षण करून झाले आहे. यापैकी २६० दरडी सुरक्षीत काढण्यात आल्या आहेत. याशिवाय रेल्वे मार्गावरील २४७ किमी असलेल्या ड्रेनची स्वच्छता करण्याचे काम सध्या प्रगतीपथावर आहे.
हेही वाचा - धनंजय मुंडेंच्या 'नाथ्रा' गावात गावकऱ्यांकडून एकजुटीने कोरोनाला हरवण्याचा प्रयत्न!