मुंबई - काळबादेवी येथील अंगडिया व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याप्रकरणी मुंबई पोलीस दलातील चार अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणातील तीन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली असून, डीसीपी सौरभ त्रिपाठी ( Suspension DCP Saurabh Tripathi ) अद्याप फरार असून, त्यांचा निलंबनाचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी गृह विभागाकडे पाठवला होता. या प्रस्तावावर आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सही झाली असून, सौरभ त्रिपाठी निलंबित करण्यात आले असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.
हेही वाचा - Income Tax Raids In Mumbai : मुंबईसह काही ठिकाणी आयकर खात्याचे छापे
मुंबई पोलिसांनी आयपीएस अधिकारी सौरभ त्रिपाठी यांच्या निलंबनाचा प्रस्ताव महाराष्ट्राच्या गृह विभागाकडे पाठवला होता. त्रिपाठी त्यांच्याविरुद्ध सुरू असलेल्या तपासावर प्रभाव टाकण्याचा प्रयत्न करत असल्याचे मुंबई पोलिसांनी आपल्या प्रस्तावात म्हटले आहे. त्रिपाठी यांच्यावर या प्रकरणाशी संबंधित अंगडियाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्रिपाठी यांनी त्यांची तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप आहे.
कोण आहेत सौरभ त्रिपाठी?
डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेले आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगले काम केलेले होते. त्यानंतर मुंबईत परीमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिले आहे. त्यांची नियुक्ती परीमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती, जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली, पण त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान त्रिपाठी यांना पहिले आरोपी म्हणून घोषित करण्यात आले आणि गृहविभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
सौरभ त्रिपाठींची अटकपूर्व जामिनासाठी सत्र न्यायालयात धाव
खंडणी प्रकरणात अटकेच्या भीतीने सौरभ त्रिपाठी यांनी न्यायालयात धाव घेतली आहे. त्यांनी मुंबई सत्र न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला आहे. बुधवारी (23 मार्च) या अर्जावर सुनावणी होणार आहे. याशिवाय त्रिपाठी यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठीचा अहवाल मुंबई पोलीस आयुक्तालयातून गृहविभागात पाठवण्यात आला आहे.
हेही वाचा - Mumbai Mahila Congress : अनिशा बागुल यांची मुंबई प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती