मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे प्रत्येक क्षेत्रातील तज्ज्ञांची मते जाणून घेण्याचा आजपासून प्रयत्न सुरू केला आहे. कालच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जनतेशी संवाद साधताना लॉकडाऊन संदर्भात काय निर्णय घ्यायचे, यासाठी आपण तज्ज्ञांशी बोलणार आहोत अशी माहिती दिली होती. त्यामुळे आज मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्रांचे संपादक आणि मालक तसेच थिएटरचे मालक आणि चालक तसेच काही निर्माते आणि दिग्दर्शक यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा केली आहे.
हेही वाचा - सिंधुदुर्ग जिल्ह्यात 51 हजारांपेक्षा जास्त नागरिकांचे कोरोना लसीकरण
वृत्तपत्र मालकांसोबत चर्चा -
सध्या राज्यात कोरोना रुग्णांचा रोज नवीन उच्चांक पाहायला मिळत आहे. आज केवळ मुंबईत 9090 कोरोना रुग्ण सापडल्याने सर्व मुंबईकर धास्तीत आहेत. तर राज्यातही कोरोना रुग्णांची संख्या रोज 40 हजार पार जाते. अशा परिस्थितीत राज्य सरकारला जर कडक निर्णय घ्यावे लागले किंवा लॉकडाऊनसारखा पर्याय वापरावा लागला तर, वृत्तपत्रांनी सरकारची बाजू योग्यरीत्या मांडावी. आपण सगळे एकजुटीने लढत आहोत ही भावना सर्वसामान्य जनतेत निर्माण व्हावी व त्यांच्या मनातली भीती जाऊन योग्य काळजी घेण्याच्या दृष्टीने जनजागृती होण्यास सहकार्य करावे म्हणून आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वृत्तपत्र संपादक आणि मालकांची व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला आहे. तर तिथेच मल्टिप्लेक्सचे काही मालक आणि चालक यांच्याशी देखील मुख्यमंत्र्यांनी संवाद साधल्याची माहिती मिळत आहे.
हेही वाचा - आम्ही सरकारसोबत, मात्र लॉकडाऊनचा निर्णय विचारपूर्वक घ्यावा - उपाध्ये
थिएटर मालकांसोबत चर्चा -
गेल्या लॉकडाऊनमुळे थिएटर मालकांना चांगलाच फटका बसला होता. आताही थिएटर आणि मल्टिप्लेक्स हे केवळ पन्नास टक्के उपस्थितीत सुरू करण्याचे निर्देश राज्य सरकारने दिले आहेत. त्यामुळे आधीच आर्थिक फटका बसलेल्या या क्षेत्राला येणाऱ्या काळात काय करावे लागेल. कोरोना रुग्णांचा उच्चांक असताना मल्टिप्लेक्स थिएटर कशा पद्धतीने सुरू ठेवू शकतो का? याची चाचपणी या व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारा मुख्यमंत्र्यांनी घेतल्याचे समजते. तर तिथेच काही निर्माते-दिग्दर्शक यांच्यासोबत देखील मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे चर्चा करून त्या क्षेत्रातल्या अडचणी कशा दूर करता येतील या संदर्भात विचार विनिमय केला आहे.