मुंबई - काेराेनाचा काळ अतिशय झोप उडवणारा होता. अर्थचक्र पूर्ववत करण्यासारखे अनेक प्रश्न होते. ऑक्सिजनचा पुरवठा होत नव्हता, काेराेनाच्या काळात रुग्णवाहिकांचे भाेंगे ऐकू येत हाेते. मात्र आता भलतेच भाेंगे ऐकायला येत आहेत, असा टाेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे ( Chief Minister Uddhav Thackeray ) यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे ( MNS Chief Raj Thackeray ) यांचे नाव न घेता लगावला. काेराेना काळात केलेल्या कामाविषयी 'इक्बाल सिंग चहल - कोविड वॉरियर' या पुस्तकाचे प्रकाशन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते सह्याद्री अतिथीगृहात झाले. यावेळी ते बाेलत हाेते.
मुख्यमंत्री पदाचा आणि काेराेनाचाही अनुभव नव्हता. दाेन वर्षापूर्वी सर्व प्रार्थना स्थळे बंद हाेती. तेव्हा रुग्णवाहिकांचे भाेंगे ऐकू येत हाेते. मात्र आता भलतेच भाेंगे ऐकायला येत आहेत, अशा भाेंग्यांच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी विराेधकांवर टीका केली. कोविड विषाणू महामारीच्या संकटात मुंबईत आयुक्तांपासून ते सफाई कामगारांपर्यंत सर्वांनीच न खचता काम करुन कोविडविरुद्ध लढा दिला. या काळात ज्या विविध उपाययोजना करुन कोविड नियंत्रणात आणला त्या 'मुंबई मॉडेल' ची या पुस्तकात आहे, असेही मुख्यमंत्री म्हणाले. काेराेनाचा प्रादुर्भाव सध्या कमी झाला आहे. मोकळा श्वास घेत आहोत. हा काळ पुढे इतिहास जमा हाेईल, त्या काळात आपण काय करीत हाेताे. याचे डाॅक्युमेंटेशन या पुस्तकातून हाेईल. ही पुस्तके काही जणांना फुकट घरपाेच वाटण्याची गरज आहे, असा विराेधकांचा खरमरीत समाचारही त्यांनी घेतला.