मुंबई : भारतीय जनता पक्ष सोबत शिवसेनेची युती ही वैचारिक पातळीवर झाली ( BJP Shivsena Alliance ) होती. मात्र आता वैचारिक पातळी ही पाताळात गेली आहे. जेव्हा शिवसेना आणि भारतीय जनता पक्षाची युती झाली होती. तेव्हा, बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते देश तुम्ही सांभाळा, राज्य आम्ही सांभाळतो. मात्र यांना महानगरपालिका पाहिजे, राज्य सरकार पाहिजे, केंद्र सरकार पाहिजे. एवढेच काहीतरी ग्रामपंचायत पण पाहिजे. सगळेच आम्हाला पाहिजे ही वृत्ती वाईट आहे. सगळच यांना पाहिजे तर, आम्ही काय धुणीभांडी करायची का? असा खरमरीत टोला राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला लगावला ( Uddhav Thackeray Criticized BJP ) आहे.
न सांगता येणे यातच गंमत
मुंबईत एका वृत्तपत्राच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भारतीय जनता पक्षाला टोला लगावला आहे. स्वाभिमानाने उभ राहण्यासाठी बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेनेची निर्मिती केली असल्याची आठवण देखील उद्धव ठाकरे यांनी यावेळी करून दिली. न सांगतात येणे यातच गंमत आहे. मात्र सांगूनही न येणे हे अत्यंत वाईट असल्याचा खरमरीत टोला नाव न घेता मुख्यमंत्र्यांनी देवेंद्र फडणवीस यांना या कार्यक्रमात ( Uddhav Thackeray mocked Devendra Fadnavis ) लगावला. तसेच सत्ता मिळवणे हे आपलं स्वप्न कधीच नव्हतं. सत्तेत आल्यानंतर कोरोना काळातही राज्य सरकारने अत्यंत उत्तम काम केलं असल्याचं यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले.
केंद्र सरकारकडून राज्य सरकारची मुस्कटदाबी
केंद्र सरकारकडून सातत्याने राज्य सरकारची मुस्कटदाबी केली जाते. वाटेल ते आरोप करून राज्य सरकारला सध्या बदनाम करण्याचा प्रयत्न सुरू असून सध्या गलिच्छ राजकारण सुरू आहे. लोकशाहीच्या मार्गाने सत्ता मिळवली पाहिजे. मात्र आता सत्तेचा गैरवापर करून सत्ता मिळवली जातेय. त्यामुळे देशात विकृत राजकारण सुरू असल्याचं खंत मुख्यमंत्र्यांनी यावेळी बोलून दाखवली. तसेच महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल सारख्याच राज्यांमध्ये केंद्रीय तपास यंत्रणेच्या धाडी पडल्या जात आहेत. गुजरात मध्ये मोठे घोटाळे समोर आले असले तरी तिथे कारवाई मात्र दिसत नाही. फक्त महाराष्ट्राला बदनाम करण्याचा प्रयत्न केला जात असल्याची टीका देखील मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.