मुंबई - एकनाथ शिंदे यांनी बंड पुकारल्यानंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकार डळमळीत झाले आहेत. सरकार टिकवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू झाल्या असून, दिल्लीतून काँग्रेसचे प्रमुख नेते कमलनाथ आणि शिवसेना पक्षप्रमुख तथा राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. या बैठकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. राज्यातील काँग्रेस नेते यावेळी उपस्थित असणार आहेत.
हेही वाचा - India Corona Cases : देशात २४ तासांत १२, २४४ कोरोना रुग्ण, १३ रुग्णांचा मृत्यू
महाविकास आघाडीच्या सरकारमधील प्रमुखपक्ष असलेल्या शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांनी बंड करत पक्षात उभी फूट पाडली आहे. यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यापुढे थेट आव्हान उभे ठाकले आहे. शिंदे यांनी राजकीय भूकंप घडवून महाविकास आघाडीला अडचणीत आणेल आहे. शिवसेनेतील बंडाने धास्तावलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेसने बैठकांचा सपाटा लावून नव्या रणनीतीचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते कमलनाथ आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात बैठक होणार आहे. दुपारी बारा वाजता वर्षा निवासस्थानी ही बैठक होणार असून, यात राजकीय स्थितीवर चर्चा केली जाणार आहे. तसेच, विधान परिषदेचे काँग्रेस उमेदवार चंद्रकांत हंडोरे यांचा पराभव झाला होता, या पराभवाचा कमलनाथ आढावा घेणार असल्याचे समजते.