मुंबई - खरी शिवसेना कोणती ? उद्धव ठाकरे ( Shiv Sena chief Uddhav Thackeray ) यांची, की शिंदे गटाची ? यावर आता राजकीय पेच निर्माण झाला असताना, ही आता न्यायालयीन लढाई लढली जाणार आहे. अशातच आता एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde ) गटाचे लक्ष 'शिवसेना भवन' असणार आहे. स्वतंत्र शिवसेनेची नोंदणी करताना याबाबत विशेष डावपेच आखले जाणार असल्याची माहिती समोर येत आहे.
आता लक्ष शिवसेना भवन ? - बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत बंडखोरी करत शिवसेनेचे तब्बल 40 आमदार आपल्या सोबत घेऊन एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री झाले. परंतु, हेच बंडखोर आमदार हीच खरी शिवसेना ( Shivsena ) असल्याचा दावा ते वारंवार करत आहेत. त्यातच आता ही लढाई न्यायालयात लढली जाणार आहे. हे सर्व होत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे यांनी आता शिवसेना भवन लक्ष केले आहे. दादर येथे शिवसेनेचे मुख्यालय शिवसेना भवन आहे. स्वतः ची शिवसेना मूळ शिवसेना असल्याचा शिंदे गटाचा दावा आहे. दोन तृतीयांश आमदारांना गटात खेचण्यात त्यांना यश आले आहे. आता गाव, तालुका आणि जिल्हा पातळी व शिवसेना पदाधिकाऱ्यांना गटात सामावून घेण्याची जोरदार मोहीम त्यांनी राबवायला सुरुवात केली आहे. शिवसेनेच्या राज्य व राष्ट्रीय कार्यकारणीत देखील त्यांनी फूट पाडण्याची यशस्वी रणनीती आखल्याने शिंदे गटाची शिवसेना खरी आहे, असा दावा ते ठामपणे करत आहेत.
राष्ट्रीय कार्यकारणीत फूट - शिवसेनेच्या 18 खासदारांपैकी 12 खासदारांचा पाठिंबा घेत शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारणी आणि पदाधिकाऱ्यांमध्ये सुद्धा शिंदे आणि दोन तृतीयांश फूट पाडली आहे. तर संपूर्ण पक्षाचा ताबा कार्यालय आणि नेमणुकांचे अधिकार घेण्यात शिंदे यांना अडथला येणार नाही असे जाणकरांचे मत आहे. तूर्तास शिंदे यांना पदाधिकाऱ्यांना नेते उपनेते पदावर नेमण्याचा अधिकार नसला, तरी तसे घडताना दिसत आहे. अखेरचा पर्याय म्हणून शिवसेना भवनावर दावा करून पक्षाचे मुख्यालय ताब्यात घेण्याचा ते प्रयत्न करतील असे राजकीय आडाखे बांधले जात आहेत.
बाळासाहेबांची शिवसेना हीच खरी शिवसेना ? - दुसरीकडे बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना, मातोश्री व शिवसेना भवन हीच खरी शिवसेना असल्याचा दावा खासदार संजय राऊत हे करत आहेत. एक गट बंड करून बाहेर पडला म्हणून तो शिवसेना होऊ शकत नाही. त्यांनी त्यांची स्वतंत्र पक्षाची स्थापना करावी. आमची शिवसेना मूळ शिवसेना असून कितीही झालं तरी ही बाळासाहेब ठाकरे, पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच शिवसेना असल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.
पक्षप्रमुख पदावर अविश्वास आणावा लागेल ? - मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः बरोबर आमदार पदाधिकारी आणि कार्यकारणी सदस्यांसह, खासदार यांच्या पाठिंब्यावर मूळ शिवसेनेवर दावा सांगत आहेत. तरी पक्षाच्या घटनेनुसार उद्धव ठाकरे हेच पक्षप्रमुख आहेत. पदाधिकाऱ्यांच्या नेमणूका आणि हकालपट्टीचे सर्वाधिकार हे उद्धव ठाकरे यांच्याकडेच आहेत. हे सर्वाधिकार शिंदे यांना स्वतः कडे घ्यायचे असतील, तर त्यांना पक्षाच्या कार्यकारणीची बैठक घेऊन उद्धव ठाकरे यांच्या पक्षप्रमुख पदावर अविश्वास आणावा लागेल, असे काही तज्ञांचे मत आहे. मात्र विधिमंडळातील स्वतंत्र गटाची नोंदणी यशस्वी झाल्यास विधानभवन मधील शिवसेना कार्यालयावर शिंदे गटाचा पूर्ण ताबा होऊ शकतो. पण पक्ष म्हणून संपूर्ण शिवसेनेवर पक्षाची घटना आणि पक्ष चिन्ह यावर शिंदे यांना दाबा मिळवायचा असेल, तर पक्षाचे मुख्यालय हे त्यांना कार्यालयीन कामकाजाचे मुख्यालय म्हणून नोंदणी करावी लागेल अशी ही अटकळ बांधली जात आहे.
हेही वाचा - CM Eknath Shinde In Delhi : आमच्याकडे १२ नव्हे १८ खासदार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा दिल्लीत गौप्यस्फोट