मुंबई - शिवसेनेत बंडखोरी करत पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना आव्हान देणारे एकनाथ शिंदे 2 दिवसांत एकत्र येणार असल्याचे शिवसेना नेत्या आणि अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी ट्विटद्वारे म्हटले आहे. सय्यद यांच्या ट्विटमुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर एकनाथ शिंदे यांनी सुरतमध्ये जाऊन पक्षाविरोधात बंड पुकारला. सेनेच्या 40 आमदारांनी शिंदे यांच्या बंडाचे समर्थन केले.
बंडखोरांची हकालपट्टी करत पक्षबांधणीवर भर - राज्यातील महाविकास आघाडी विशेषतः पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे सरकार अल्पमतात आले आहे. त्यामुळे ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. तसेच पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी एकनाथ शिंदे यांची पक्षातून हकालपट्टी केली. पक्षात अंतर्गत दुफळी यानंतर वाढू लागली. अनेकांनी ठाकरे यांना रामराम करत शिंदे गटात सामील झाले. पक्षातील गळती वाढू लागल्यानंतर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आक्रमक होत, बंडखोरांची हकालपट्टी करत पक्षबांधणीवर भर दिला आहे. अशातच दिपाली सय्यद यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चर्चेसाठी एकत्र यावे यासाठी भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मदत केल्याचे खळबळजनक ट्विट केल्याने सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत.
दीपाली सय्यद यांचे ट्विट - 'येत्या 2 दिवसांत आदरणीय उद्धवसाहेब व आदरणीय शिंदेसाहेब शिवसैनिकांच्या भावनांचा आदर करून पहिल्यांदा चर्चा करायला एकत्र येणार हे समजल्यावर खूप बरे वाटले. शिंदे साहेबांना शिवसैनिकांची तळमळ समजली आणि उद्धव साहेबांनी कुटुंबप्रमुखाची भूमिका मोठ्या मनाने निभावली हे स्पष्ट झाले आहे. या मध्यस्थीकरिता भाजप नेत्यांनी मदत केली याबाबत धन्यवाद ! चर्चेच्या ठिकाणाची प्रतीक्षा असेल'. असं ट्विट शिवसेना नेत्या दीपाली सय्यद यांनी शनिवारी रात्री उशिरा केले आहे. त्यामुळे राज्याच्या राजकारणात नवा ट्विस्ट येणार का हे पहाव लागणार आहे.
आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे - लवकरच माननीय आदित्य साहेब मंत्रीमंडळात दिसावे. शिवसेनेच्या 50 आमदारांनी मातोश्रीवर दिसावे. आदरणीय उद्धव साहेब व आदरणीय शिंदेसाहेब एक व्हावे, शिवसेना हा गट नसुन हिंदुत्वाचा गड आहे. त्यावरचा भगवा नेहमी डौलाने फडकत राहील', असे आणखी एक सूचक ट्विट दिपाली सय्यद केले आहे.
झेडपीच्या अध्यक्षासह 150 नगरसेवक शिंदे गटात सामील - शिवसेनेचे बंडखोर नेते आणि राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( CM Eknath Shinde News ) यांना ठाणे जिल्ह्यातून मिळणारा पाठिंबा दिवसेंदिवस वाढतो आहे. ठाणे जिल्ह्यातील ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबिवली, मीरा-भाईंदर, उल्हासनगर महापालिका आणि अंबरनाथ नगरपरिषदेच्या १५० च्या आसपास नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला ( Thane 150 Councilor joined Shinde group ) आहे. आज (शनिवार) ठाणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा पुष्पा पाटील, कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष आणि शहरप्रमुख वामन म्हात्रे, पंचायत समितीचे बाळाराम कांबरी यांच्यासह कुळगाव बदलापूर नगरपालिकेचे सर्वच २४ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदे गटाला पाठिंबा दिला. त्यामुळे ठाणे जिल्हा ग्रामीण भागासह शहरी भागात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला शिंदे गटाकडून धक्के पे धक्का तंत्र वापरून जिल्हातील शिवसेना काबीज केल्याचे दिसून आले आहे.
सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट - कुळगाव बदलापूर नगर परिषदेच्या नगरसेवकांनी आतापर्यंत आपली भूमिका स्पष्ट केली नव्हती. यातील काही ज्येष्ठ नगरसेवकांनी सुरुवातीला मातोश्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत चर्चा केली होती. शनिवारी मात्र कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या सर्वच माजी नगरसेवकांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेत त्यांना आपला पाठिंबा दर्शवला. यावेळी शिवसेनेचे सर्व माजी नगरसेवक आणि स्विकृत नगरसेवक उपस्थित होते, अशी माहिती शहर प्रमुख वामन म्हात्रे यांनी दिली आहे. शिवसेनेच्या एका माजी नगरसेवकाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. तर एका माजी नगरसेवकाचे काही महिन्यांपूर्वी निधन झाले आहे. त्यामुळे शहरातील माजी नगरसेवकांची संख्या २५ वरून २३ वर आली होती. त्यातच शिवसेनेचे माजी गट नेते श्रीधर पाटील यावेळी उपस्थित नसल्याने आश्चर्य व्यक्त झाले. मात्र गटनेते श्रीधर पाटील यांनी यापूर्वीच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती वामन म्हात्रे यांनी दिली आहे.
बदलापूर शहरात शिवसेनेत एकही माजी नगरसेवक उरलेला नाही - कुळगाव बदलापूर नगरपालिकेच्या नगरसेवकांसह ठाणे जिल्हा परिषदेचे अध्यक्ष पुष्पा पाटील, अंबरनाथ पंचायत समितीचे बाळाराम कांबरी त्यांचे इतर सहकारी आणि पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. शिवसेनेत असलेल्या सर्वच माजी नगरसेवकांनी शिंदे गटाला पाठिंबा देण्यामुळे बदलापूर शहरात शिवसेनेत एकही माजी नगरसेवक उरलेला नाही. बदलापूर शहर ठाणे जिल्ह्यातील सर्वांनीच पाठिंबा देणारे एकमेव शहर ठरले आहे.
हेही वाचा - Maharashtra Politics : 'ये फेविकॉल जोड है, तुटेगा नहीं', मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा विश्वास !