मुंबई - मुंबईत गणेशोत्सव सुरू झाल्यापासून पाऊस पुन्हा सक्रिय झाला आहे. शहरात नेहमी रिपरिप पडणाऱ्या पावसाने शुक्रवारी रात्री जोरदार हजेरी लावली. मात्र, या पावसाने शहरातील कोणत्याही परिसरात पाणी साचल्याचे समोर आले नाही, रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू आहे. मुंबईत आज ढगाळ वातावरण राहणार असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली.
मुंबईत शुक्रवारी रात्री जोरदार पावसाने हजेरी लावल्याने हवामान विभागाच्या कुलाबा येथे 108 मिलिमीटर, तर सांताक्रूझ येथे 85.4 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबईत शहर विभागात 108 मिलिमीटर पाऊस पडला असला तरी अद्याप सखल भागात कुठेही पाणी साचल्याची तक्रार नोंद झालेली नाही. पाणी साचले नसल्याने वाहतुकीवरही परिणाम झालेला नाही. रस्ते आणि रेल्वे वाहतूक सुरळीत सुरू असल्याची माहिती पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे. दरम्यान, आज दिवसभरात मुंबई शहर आणि उपनगरात ढगाळ वातावरण राहणार असून जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली असल्याची माहिती आपत्कालीन व्यवस्थापन विभागाने दिली आहे.
समुद्राला आज सकाळी 9. 45 वाजता 3.79 मीटरची तर रात्री 9.37 वाजता 3.30 मीटरची भरती आहे. या दरम्यान मुंबईत सतत जोरदार किंवा मुसळधार पाऊस पडल्यास मुंबईत सखल भागात पाणी साचण्याची शक्यता वर्तवली जात आहे.