मुंबई - कोविडच्या संकटात घर, कुटुंबाचे बंध बाजुला ठेवून, जीवाची पर्वा न करता रुग्णसेवेसाठी झटणाऱ्या हजारो परिचारिकांना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जागतिक परिचारिका दिनानिमित्त शुभेच्छा दिल्या. ‘तुमच्या त्याग, समर्पणाला मानाचा मुजरा. तुमचे हे योगदान जग कदापीही विसरणार नाही,’ अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी रुग्णसेवेत अथक परिश्रम घेणाऱ्या परिचारिकांविषयी कौतुकोद्गार काढले.
नर्सेस 'सिस्टर' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिचारिका कोविड योद्ध्या आहेत. त्या कोविड-१९ च्या पहिल्या लाटेपासून ते आतापर्यंत आघाडीवर राहून, रुग्णसेवेत मेहनत घेत आहेत. आपले घर, कुटुंब यांची जबाबदारी सांभाळत, त्यांनी रुग्णसेवेलाच प्रथम प्राधान्य दिले आहे. आजही त्या डॉक्टर्स आणि तज्ज्ञांच्या खांद्याला-खांदा लावून काम करत आहेत. त्यामुळे हजारो रुग्णांना विषाणूशी लढण्याचे बळ मिळाले आहे. कित्येकांना बरे होऊन आपल्या कुटुंबात परतता आले आहेत. या योगदानाचे मुख्यमंत्र्यांनी कौतुक केले आहे.