मुंबई - कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नियमांचे पालन करत आज शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आठव्या स्मृतिदिनी राज्यभरात अभिवादन करण्यात आले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब तर राज्यातील अनेक मंत्री आणि राजकीय नेत्यांनीही बाळासाहेब ठाकरे यांच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क मैदानातील स्मारकावर जाऊन अभिवादन केले.
असाल त्या ठिकाणाहूनच अभिवादन करा
17 नोव्हेंबर 2012 साली बाळासाहेब ठाकरे यांचे निधन झाले. त्यांनी आयुष्यातील 40 वर्षांहून अधिक काळ दसरा मेळाव्याच्या निमित्ताने शिवाजी पार्क मैदानावर सभा घेतल्या. बाळासाहेबांच्या निधनानंतर याच मैदानावर त्यांचे अंत्यसंस्कार करण्यात आले. याठिकाणी स्मारकावर दरवर्षी शिवसैनिक बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. राज्यात आणि मुंबईत कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव असल्याने बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतिदिनानिमित्त घरातून, कार्यालयातून, असाल त्याच ठिकाणाहून शिवसैनिकांनी अभिवादन करण्याचे आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले होते. शिस्तीचे पालन करा, हेच बाळासाहेबांना खरे अभिवादन आहे, असे ते म्हटले.
अभिवादनाला नेतेमंडळींची उपस्थिती
उद्धव ठाकरे यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत राज्यात शिवसेना शाखांच्या ठिकाणी बाळासाहेबांना अभिवादन करण्यात आले. शिवसेनेचे कार्याध्यक्ष उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब शक्तिस्थळावर जाऊन बाळासाहेबांना अभिवादन केले. शिवसेना नेते संजय राऊत, मनोहर जोशी, छगन भुजबळ, विधान परिषदेतील विरोधी पक्ष नेते प्रविण दरेकर, महापौर किशोरी पेडणेकर, शिवसेनेचे मंत्री व नेत्यांनी शक्तिस्थळावर हजर राहून बाळासाहेबांना अभिवादन केले.
स्मरक, शक्तिस्थळ, सुरक्षा
दादरच्या छत्रपती शिवाजी महाराज पार्क येथील शक्तिस्थळावर मोठ्या प्रमाणात शिवसैनिक आणि इतर राजकीय नेते बाळासाहेबांना अभिवादन करण्यासाठी येत असतात. यापार्श्वभूमीवर स्मारकावर फुलांची आरास करण्यात आली होती. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे सहकुटुंब अभिवादन करण्यासाठी येणार असल्याने मोठ्या प्रमाणात सुरक्षा बंदोबस्त करण्यात आला होता. मोठ्या प्रमाणात चौकशी करण्यात येत होती.