मुंबई - लॉकडाउनच्या काळात बंद असलेल्या गोष्टी हळूहळू उघडण्यात येत आहेत. मात्र, पुन्हा संसर्ग वाढू नये म्हणून याबाबत खबरदारी घेतली जात आहे. कारण जनतेची जबाबदारी माझ्यावर आहे, हे उघडा ते उघडा असं सांगणाऱ्यांवर नाही, अशा शब्दांत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टीकास्त्र सोडलं आहे.
ठाकरे म्हणाले, मला या विषयावर राजकारण करायचे नाही. पण, हे उघडा, ते उघडा, म्हणत आहेत. हो सर्व उघडतो! जबाबदारी घेताय?, असा थेट सवाल उद्धव ठाकरे यांनी यावेळी विरोधकांना केला. तसेच, या सरकारच्या माध्यमाने जनतेची जेवढी जबाबदारी माझ्यावर आहे. तेवढी हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांवर नाही, असेही ते म्हणाले.
दिवाळीनंतर कोरोना रुग्णसंख्येत होत असलेल्या वाढीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून राज्यातील जनतेशी संवाद साधला. कोरोना अजूनही संपलेला नाही. कोरोनाची दुसरी लाट जर आली तर ती लाट नसून सुनामी असणार आहे. कोरोनावर सध्या तरी कोणतीही लस उपलब्ध नाही. जेव्हा लस येईल तेव्हा येईल तोपर्यंत काळजी घ्या. आपल्या पुन्हा लॉकडाऊन लागू करायचा नाही मात्र लॉकडाऊनची वेळ आणू नका असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेला केले
शाळा सुरू करणे अजूनही प्रश्नांकित -
मुख्यमंत्री म्हणाले, राज्यातील शाळा पुन्हा सुरू करायच्या आहेत, मात्र आपण अजूनही उघडू शकलेलो नाही. कारण कोरोनाची भीती कायम आहे. राज्यातील अनेक शिक्षकच कोरोना पॉढिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे शाळा कधी सुरू होतील याबद्दल निश्चित काहीच सांगू शकत नाही.
पोस्ट कोविडचे दुष्परिणाम भयंकर -
कोरोनानंतरही पोस्ट कोविडचे भयंकर दुष्परिणाम रुग्णावर जाणवत आहेत. कुणाला पोटाचे, फुफ्फुसाचे विकार होत आहेत. कुणाला मेंदुचे विकार होत आहेत. त्यामुळे कोरोनामुक्त झाले म्हणजे समस्या संपली असे नाही.
लस अजूनतरी हातात आलेली नाही -
लस येणार येणार म्हणतात मात्र अजूनही ती हातात आली नाही. कोरोनावरील लस येईपर्यंत काळजी घ्या. मास्क वापरा, अनावश्यक गर्दी टाळा, सॅनिटायझर्स वापरा व अनावश्यक प्रवास टाळा.कोरोनावर लस अद्याप आलेली नाही. त्यामुळे लस आल्यानंतरही ती कशी द्यायची हे अद्याप अधांतरीच आहे, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटले आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून मास्क, हात धुणे, अंतर पाळणे या त्रिसुत्रीचा वापर करा असं आवाहनही मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
महाराष्ट्राला २४ कोटी लसींची आवश्यकता -
लस अजूनही तयार झाली नाही. मात्र ती तयार झाल्यानंतर आपल्य़ाला कधी मिळणार त्याची साठवणूक प्रक्रिया कशी असणार याची काहीच माहिती नाही. त्याचबरोबर राज्याच्या वाट्याला किती लसी येणार याची काहीच माहिती नाही. महाराष्ट्राती १० ते १२ कोटी जनतेला कशी लस पुरवणार हा प्रश्न आहे. त्यात बुस्टर डोस द्यावा लागतो त्यामुळे आपल्याला २० ते २४ कोटी लसींची गरज आहे.
कोरोनाची दुसरी लाट नव्हे तर सुनामी -
कोरोनाची दुसरी लाट नव्हे तर सुनामी येईल. या लाटेत तरुणही संक्रमित होत आहे. यामुळे वृद्धांना धोका जास्त आहे. जर रुग्णालये कमी पडली तर जीव वाटवणे कठीण जाईल. आरोग्य यंत्रणा कमी पडेल.
महाराष्ट्राचा आरोग्य नकाशा तयार करायचा आहे -
आपल्याला राज्यातील जनतेचा आरोग्य नकाशा तयार करायचा आहे. यामुळे कोणत्या व्यक्तीला कोणता आजार आहे. याची माहिती संकलित करता येईल. त्यानुसार संबंधित व्यक्तीला औषधोपचार पुरवता येतील.
कार्तिकी वारीला गर्दी करू नका -
महाराष्ट्रातील जनतेच्या सहकार्याला तोड नाही, आपण सर्व सण साध्यापणाने साजरा केला. दसरा मेळावाही साधा साजरा केला, उत्तर भारतीय जनतेनेही छटपूजा साध्या पद्धतीने व घरच्या घरी साजरी करून प्रशासनाला सहकार्य केले. आपण सर्व काही कायदे करून बंद करू शकत नाही. मात्र दिवाळीत कमी फटाके वाजवून आवाहनाला चांगला प्रतिसाद दिला, त्याचप्रमाणे कार्तिकी वारीला कृपया गर्दी करू नका, भक्तिभावाने वारी साजरी करा, असे आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.