मुंबई - तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने सातत्याने राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नियुक्तीसाठी राज्यपालांकडे ( Governor Bhagat Singh Koshyari ) लकडा लावला होता. मात्र तरीही राज्यपालांनी या 12 आमदारांच्या नावावर अखेरपर्यंत शिक्कामोर्तब केले नाही. एकनाथ शिंदे यांनी बंडखोरी केल्यानंतर ठाकरे सरकार कोसळले आणि आता राज्यात शिंदे – फडणवीस यांचे नवे सरकार आले. महाविकास आघाडीच्या काळात राज्यपाल नियुक्त १२ आमदारांच्या नियुक्तीच्या यादीवरून राज्यपाल विरुद्ध राज्य सरकार असा संघर्ष पाहायला मिळाला होता. यातच आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ( Eknath Shinde ) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच १२ आमदारांच्या नावांची नवीन यादी राज्यपालांना पाठवण्यावर एकमत झाले आहे.
यादीत स्थान मिळवण्यासाठी लॉबिंग - राज्यपाल भगतसिंह कोषारी यांनी महाविकास आघाडी सरकारने दिलेली यादी रद्दबातल ठरवल्यानंतर आता शिंदे फडणवीस सरकारकडून लवकरच नवी यादी दिली जाणार आहे. या १२ नावांसाठी शिंदे गट आणि भाजपमध्ये जोरदार लॅाबिंग सुरू असल्याची चर्चा आहे. आमदारांचे संख्याबळ पाहता भाजपला १२ पैकी ८ तर शिंदे गटाला ४ जागा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आता या १२ नावांमध्ये नेमकी कोणाला संधी द्यायची? असा मोठा प्रश्न शिंदे-फडणवीस यांच्यासमोर निर्माण झाला आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत पराभव झालेल्या, तसेच शिंदे आणि फडणवीसांवर विश्वास ठेवून पक्षात आलेल्या लोकांना जास्त संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. शिंदे यांनी ज्या नेत्यांना जिल्हाप्रमुख, संपर्कप्रमुख अशी जबाबदारी दिली आहे, त्याच नेत्यांची आमदारपदी वर्णी लागणार असल्याची चर्चा आहे. त्यासोबतच विधान परिषदेची टर्म संपलेले अनेक आमदारदेखील पुन्हा लॅाबिंग करत असल्याची माहिती मिळाली आहे.
शिंदे गटातील संभाव्य नावे - एकनाथ शिंदे यांच्या गटाला चार जागा मिळण्याची शक्यता असून या जागांसाठी चढाओढ सुरू आहे. यात रामदास कदम, विजय शिवतारे, आनंदराव अडसूळ किंवा अभिजित अडसूळ, अर्जुन खोतकर, नरेश मस्के, चंद्रकांत रघुवंशी हे शिंदे गटातील संभाव्य नावांची यादी आहे.
भाजप मधून कोणाला मिळणार संधी? भारतीय जनता पक्षाच्या वतीने आठ सदस्यांची नियुक्ती केली जाणार आहे. या आठ जणांमध्ये स्थान मिळावे यासाठी अनेक राजकीय नेते लॉबिग करत आहेत. यामध्ये काँग्रेसचे माजी मंत्री आणि शरद पवारांच्या कट्टर विरोधक हर्षवर्धन पाटील, माजी मंत्री पंकजा मुंडे, राजकुमार बडोले, सदाभाऊ खोत ही काही नावे निश्चित मानली जात असून प्रादेशिक विभागनिहाय आणि जातींची समीकरणे सांभाळून अन्य जागांवरती नियुक्ती करण्यासाठी पक्षश्रेष्ठीशी चर्चा सुरू असल्याची माहिती भाजपमधील सूत्रांनी दिली. उद्धव ठाकरें यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देताना १२ आमदारांच्या मुद्द्यावरून राज्यपालांना टोला लगावला होता. मात्र आता ठाकरे सरकारने दिलेली यादी रद्दबातल ठरवल्या नंतर नव्या यादीची आणि नियुक्तीची लवकरच अधिकृत घोषणा होईल अशी शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.