मुंबई - औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केल्याचा वाद ताजा असतानाच पुन्हा एकदा मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटर हँडलवरून उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. बुधवारी मंत्रिमंडळाची बैठक झाली. त्यात उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्याची माहिती मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटर हँडलवर देताना धाराशिव(उस्मानाबाद) असा केला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीत पुन्हा एकदा ठिणगी पडण्याची शक्यता आहे.
काय आहे निर्णय-
उस्मानाबाद येथे नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालय तसेच 430 खाटांचे रुग्णालय सुरू करण्यास मंत्रिमंडळ बैठकीत मंजूरी देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या ट्वीटर हँडलवरून त्या निर्णय़ाची माहिती दिली गेली. त्यात उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव केला गेला आहे. यापूर्वीही काँग्रेसने औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर करण्यास विरोध दर्शवला होता. त्यानंतरही धाराशिवचा उल्लेख सीएमओकडून केला गेला आहे. त्यावर काँग्रेसकडून काय प्रतिक्रिया येतात हे पहावे लागेल.
संभाजीनगर बाबत काय म्हणाले होते थोरात-
औरंगाबादचे संभाजीनगर असे नामांतर करण्याच्या मुद्द्यावर बोलताना थोरात म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे आमचे आराध्य दैवत आहे. त्यांच्या नावाचा वापर करून नामांतराचे राजकारण खेळू नये, आपण सर्व मिळून औरंगाबादच्या विकासासाठी काम करूया. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकार हे किमान समान कार्यक्रमावर चालते. भारतीय राज्यघटनेची मूलतत्त्वे हा किमान समान कार्यक्रमाचा गाभा आहे. त्यामुळे आम्ही पुन्हा ठणकावून सांगतो, सामाजिक सलोखा टिकून राहावा यासाठी कोणत्याही शहराच्या नामांतरास आमचा ठाम विरोध आहे, असे त्यांनी स्पष्ट केले होते.
माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला खडे बोल
औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केल्यानंतर थोरातांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाला चांगलेच धारेवर धरले होते. शहरांचे परस्पर नामांतर करू नये, सरकारी कामकाज हा कायदेशीर दस्तऐवज असतो, याचे भान बाळगावे. शहरांचे नामांतरण करणे हा महाविकास आघाडीच्या किमान समान कार्यक्रमाचा भाग नाही. अशा शब्दात महसूल मंत्री थोरात यांनी माहिती व जनसंपर्क महासंचानलयासही खडे बोल सुनावले होते. माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाने सीएमओच्या ट्विटर हँडलवर औरंगबाद येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालया संदर्भात घेतलेल्या मंत्रिमंडळ निर्णयाची जाहिरात करत असताना औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा होता. त्यावरून थोरातांनी प्रतिक्रिया देत शहरांच्या नामातराला काँग्रेसचा ठाम विरोध असल्याचे ठणकावून सांगितले होते.
औरंगजेब 'सेक्युलर' नव्हता, अजेंड्यातील सेक्युलरमध्ये औरंगजेब बसत नाही - मुख्यमंत्री
औरंगाबादचे नाव संभाजीनगर करण्याचा वाद वाढत असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब सेक्युलर नव्हता. त्यामुळे अजेंड्यातील 'सेक्युलर'मध्ये औरंगजेब बसत नाही, अशी प्रतिक्रिया देत काँग्रेसचा दबाव झुगारून लावला होता. त्यानंतरी सीएमओवर औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगरच केला जात होता. त्यात आता आणखी एक पाऊस शिवसेनेने पुढे टाकले आहे. औरंगाबाद नंतर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव केला आहे.
काँग्रेस काय भूमिका घेणार-
शहरांच्या नामांतराला विरोध असल्याचे काँग्रेसने या पुर्वीच सांगितले आहे. शिवाय महाविकास आघाडीच्या समान किमान कार्यक्रमाचा तो भाग नसल्याचेही स्पष्ट केले होते. त्यानंतरही सीएमओवर उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव करण्यात आला आहे. त्यामुळे काँग्रेसला डिवचण्याचेच काम शिवसेने मार्फत झाले आहे. त्याला काँग्रेस आता कशा प्रकारे प्रत्युत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष आहे.