मुंबई - भाजप नेते किरीट सोमैया यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केले आहे. उद्धव ठाकरे आपली संपत्ती लपवण्यात व्यस्त आहेत, तर धनंजय मुंडे हे आपल्या मुलांना लपवण्यात व्यस्त असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दरम्यान किरीट सोमैया यांनी मुख्यमंत्र्यांवर गंभीर आरोप केला आहे. मुलुंड येथील 5 हजार खाटांच्या रुग्णालयाचे कंत्राट उद्धव ठाकरे यांनी आपल्या निकटवर्तीय असलेल्या कंत्राटदारांना दिले. मात्र नामुष्की झाल्याने हे कंत्राट मागे घ्यावे लागले, असा दावा सोमैया यांनी केला आहे. महापालिका आयुक्त इक्बाल चहल देखील या घेट्याळात सहभागी आहेत. महापालिका आयुक्त आणि मुख्यमंत्री जनतेला वेडे समजतात का असा सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला आहे. महापालिकेचे विरोधी पक्षनेते रवी राजा यांनी याबाबत पत्र लिहून आक्षेप नोंदवला असल्याचेही सोमैया यांनी यावेळी सांगितले, तसेच महापालिकेचे आयुक्त चहल यांची पदावरून हकालपट्टी करावी अशी मागणी देखील त्यांनी यावेळी केली आहे.
जमीन खरेदीवरून मुख्यमंत्र्यांवर आरोप
दरम्यान किरीट सोमैया यांनी गेल्या नोव्हेंबरपासून उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबीयांवर जमीन खरेदी प्रकरणात आरोप करण्यास सुरुवात केली आहे. ठाकरे कुटुंबीयांनी आतापर्यंत 40 जमिनीचे व्यवहार केल्याचा आरोप सोमैय्या यांनी केला आहे. त्यापैकी 30 जमिनीचे सौदे फक्त दिवंगत अन्वय नाईक यांच्याकडेच झाले आहे. मुख्यमंत्र्यांचा त्याच्याशी काय संबंध आहे, याची चौकशी व्हावी अशी मागणी देखील त्यांनी केली आहे.