मुंबई - कोरोना व्हायरसचे रुग्ण मुंबईत दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी देशाची आर्थिक राजधानी मुंबईत पोलिसांकडून लॉकडाऊन कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या व्यक्तींच्या विरोधात कारवाई मोठ्या प्रमाणात करीत आहेत . कोरोना व्हायरसचे संक्रमण वाढू नये म्हणून तोंडाला मास्क लावणे हे आवश्यक असून तसा शासनाचा नियम सुद्धा आहे. तरीही बरेच जण हे रस्त्यावर जाताना तोंडाला मास्क लावत नसल्याचे दिसून येत आहे.
मुंबई पोलिसांनी मास्क न वापरणाऱ्या 4811 जणांवर कारवाई केली आहे. 20 मार्च ते 21 जुलै या दरम्यान मुंबई शहरात विविध ठिकाणी लॉकडाऊनचे उल्लंघन करणाऱ्याच्या 17436 प्रकरणात तब्बल 39517 आरोपींवर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. लॉकडाऊन, संचारबंदी नियमांचे उल्लंघन करणार्या 6104 फरार आरोपींचा पोलीस शोध घेत असून तब्बल 14889 आरोपींना पोलिसांनी नोटीस देऊन सोडले आहे, तर 18524 आरोपींना जामिनावर पोलिसांनी सोडून दिलेले आहे.
लॉकडॉउन काळामध्ये कलम 188 नुसार मुंबईतील दक्षिण मुंबईत 1671 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. मध्य मुंबईत 2534 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत . तर पूर्व मुंबई तब्बल 2872 गुन्हे दाखल झाले आहेत. पश्चिम मुंबईत 2791 उत्तर मुंबईत 7568 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत. हे गुन्हे कोरोना ग्रस्त रुग्णांच्या संदर्भात , विनापरवानगी दुकान किंवा हॉटेल उघडी ठेवण्यासंदर्भात, पानटपरी , सार्वजनिक ठिकाणी गर्दी करणे व अवैध वाहतूक प्रकरणी नोंदविण्यात आले आहेत.