हैदराबाद - दिवाळी आणि फरार हे गणित जुळलेलं. दिवाळीत मित्रांच्या घरी जाऊन फराळ करायचा आणि त्या सर्वांना आपल्या घरी बोलावून त्यांना फरार देण्याची प्रथा ग्रामीण भागामध्ये आजही आहे. शहरी भागात यात बदल झालेला दिसतो. ज्याप्रमाणे फराळाच्या आदरातिथ्यात बदल झाला त्याचप्रमाणे फराळातील पदार्थामध्ये देखील काळानुरूप बदल झाला आहे. दिवाळीच्या पारंपारिक पदार्थांची जागा आता ताबडतोबत तयार होणारे आयते विकत मिळाणाऱ्या पदार्थांनी घेतली आहे. धावती जीवनशैली, वेळेचा अभाव, निरूत्साहपणा, जिव्हाळ्यात कमी होणे आणि रेडिमेट पदार्थ खरेदी करण्यासाठीची आर्थिक सुबत्ता यामुळे दिवाळीच्या पदार्थांमध्ये बदल झालेला दिसतो.
ग्रामीण भागात दिवाळीच्या साफसफाईनंतर फराळाची चूल पेटते. आठवडाभर दररोज चिवडा, लाडू, चकल्या, शंकरपाळे, अनरसे, शेव यासारख्या पदार्थांची मेजवानी असते. पण ग्रामीण भागातील तीच व्यक्ती शहरात आली की या परंपरेत विलक्षण बदल झालेला दिसतो. त्याच्या जीवनशैलीपासून ते दिवाळीच्या पारंपारिक पदार्थांमध्ये बदल झालेला दिसतो. चला तर आपण बघुयात या पारंपारिक पदार्थांत काय बदल झाले आणि त्याजागी कोणते नवीन पदार्थ आलेत, याबाबतची माहिती.
रेडिमेट पदार्थांवर भर -
अनेकजण खासगी क्षेत्रात काम करत असतात. बऱ्याच घरी पती-पत्नी दोघेही नोकरी करतात. खासगी कंपन्यामध्ये दिवाळीच्या मोजक्याच सुट्ट्या असतात. त्यामुळे दिवाळीची कामे करण्यास वेळ मिळत नाही. याव्यतिरिक्त अनेकांनी वेळ मिळतो पण इतके सर्व पदार्थ बनवण्याचा कंटाळा करत असतात. त्यामुळे दिवाळीचे पदार्थं बनवण्याऐवजी रेडिमेट पदार्थ खरेदी करण्याकडे त्यांचा कल असतो. अनेकजण प्रतिष्ठा म्हणून देखील रेडिमेट पदार्थ खरेदी करत असतात. दिवाळीचे पदार्थ घरी बनवण्याचा गोडवा रेडिमेट पदार्थांनी कमी केला आहे.
चॉकलेट्सची विक्रमी विक्री -
दिवाळीच्या पदार्थात चॉकलेट या एका नवीन पदार्थाची भर पडली आहे. विविध प्रकारची चॉकलेट्स दिवाळीनिमित्त भेट दिली जातात. अनेक चॉकलेट्स कंपन्या दिवाळीत चॉकलेट भेट देण्याच्या जाहिराती करतात. भेट द्यायला सोयीस्कर होईल अशा प्रकारची पॅकींग केली जाते. लहान मुलांना चॉकलेट फार आवडतात. शिवाय कोणाला भेट म्हणून द्यायला देखील ते सोयीस्कर आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्त चॉकलेट भेट देणाऱ्यांची संख्या वाढली. तर त्याउलट पारंपारिक पदार्थ कमी झाले.
ड्रायफ्रुट्स -
दिवाळीत अनेकांना खासगी कंपन्यात कर्मचाऱ्यांना ड्रायफ्रुट भेट मिळतात. त्यामुळे दिवाळीतील भेटवस्तूमध्ये हा नवी ट्रेंड आला आहे. अनेकजण पारंपारिक पदार्थांच्या भानगडीत न पडता ड्रायफ्रुट भेट देतात. हे पदार्थ महागडे असल्याने अनेकांसाठी प्रतिष्ठेचा विषय ठरतो. अनेकांना तर आपला सामाजिक स्तर उंचावल्याचा भास होतो. अनेकजण ड्रायफ्रुट्स भेट देत असल्यामुळे पारंपारिक पदार्थांची मागणी कमी होत आहे.
मिठाई -
दिवाळीत मिठाई भेट म्हणून देणाऱ्यांची संख्या खूप आहे. यापूर्वी दिवाळीनिमित्त मामाच्या गावी जात असताना सोबत घरातील सर्व पदार्थ बॅगमध्ये टाकले जायचे. आणि परताना मामाच्या घरून सुद्धा फराळ दिला जायचा. आता मात्र अनेकठिकाणी ही चाल विरळ झाली आहे. एकतर पहिल्यासारखं कोणाच्या गावी गेल्यानंतर आठ-आठ दिवस मुक्काम करणे बंद झाले आहे. सगळेच कामात व्यस्त असल्याने सकाळी जाणे आणि सायंकाळी परत येणे किंवा दुसऱ्या दिवशी परत येणे, अशी प्रथा सुरू झाली आहे. तसेच पारंपारिक पदार्थांऐवजी मिठाईसारखे पदार्थं भेट म्हणून दिले जात आहे.