मुंबई - महाविकास आघाडी सरकारने गोरेगाव येथे सर्वपक्षीय आमदारांना तीनशे घरे बांधण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र राज्य सरकारने हा निर्णय आमदारांना बदनाम करण्यासाठी घेतला असल्याचा आरोप भाजपाचे आमदार चंद्रशेखर बावनकळे यांनी केला आहे. काल गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी मुंबईतील बीडीडी चाळींच्या पुनर्विकास प्रकल्पातील नवीन नावे जाहीर केली. यामध्ये बीडीडी चाळींना बाळासाहेब ठाकरे, शरद पवार आणि स्वर्गीय पंतप्रधान राजीव गांधी यांची नाव देण्यात येणार असल्याचं जाहीर केले. त्यामुळे आमदारांना मुंबईत गोरेगाव येथे बांधण्यात येणाऱ्या तीनशे घराच्या प्रकल्पांना जितेंद्र आव्हाड यांनी "जितेंद्र आव्हाड चाळ" असं नाव द्यावं असा टोमणाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी लगावला आहे.
नाराज आमदार पळून जाऊ नये म्हणून प्रलोभन - महाविकास आघाडी सरकारमध्ये अनेक नाराज आमदार आहेत. यामध्येच नाराज आमदारांपैकी शिवसेनेच्या नाराज आमदारांची संख्या जास्त आहे. हे नाराज आमदार महाविकासआघाडी पासून कुठे लांब जाऊ नये त्यामुळे त्यांना घरांचे प्रलोभन महाविकास आघाडी सरकारकडून देण्यात येत असल्याचा आरोपही चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला.
वीज कंपन्यांना राज्य सरकारने अडचणीत आणले - राज्यात विजेचा प्रश्न दिवसेंदिवस अजूनच जटिल बनत चालला आहे. शेतकऱ्यांची आणि सामान्य नागरिकांची वीज कनेक्शन अद्यापही तोडली जात आहे. त्यातच स्वतः ऊर्जामंत्री महावितरणचे 20 हजार कोटी रुपये राज्य सरकारकडे थकीत असल्याचं सांगत आहेत. त्यामुळे वीज कंपन्यांना शेतकर्यांनी नाही तर राज्य सरकारने अडचणीत आणले असल्याचा आरोप चंद्रशेखर बावनकुळे यांनी केला. तसेच राज्यात तात्कालीन देवेंद्र फडवणीस सरकार असताना शेतकऱ्यांना कधीही विजेता प्रश्न पडू दिला नाही. राज्यात पुन्हा भारतीय जनता पक्षाचे सरकार आल्यास शेतकर्यांना पुढील पाच वर्ष विजेसाठी एकही रुपया द्यावा लागणार नाही असे आश्वासनही दिले.