मुंबई - प्रादेशिक हवामान विभागाने काही दिवसांपूर्वी अंदाज वर्तवला होता की वातावरण बदलामुळे 5 नोव्हेंबर नंतर राज्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. ही शक्यता तंतोतंत खरी ठरली आहे. मुंबईत सकाळपासून ढगाळ वातावरण तयार झाले आहे.
तुरळक ठिकाणी पाऊस -
अरबी समुद्रात तसेच लक्षद्वीपदवळ कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात पाऊस पडतोय. हा कमी दाबाचा पट्टा महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत आहे. त्यामुळे 7 नोव्हेंबरपर्यंत पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर सोलापूर, लातूर, उस्मानाबाद या जिल्ह्यांमध्ये देखील पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
राज्यातील पावसाचा अंदाज -
वातावरणाबदलामुळे समुद्राच्या वाऱ्यांचा वेग अधिक रहाणार आहे. कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर, पुणे आणि अहमदनगरमध्ये पावसाचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. तळकोकणातील रत्नागिरी आणि सिंधुदुर्गात जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही चांगला पाऊस बघायला मिळू शकतो. ज्यात प्रामुख्याने उस्मानाबाद, बीड आणि लातुरात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज आहे. काल देखील ऐन दिवाळीत पावसानं राज्याच्या विविध भागात हजेरी लावली आहे. ठाणे, रायगड, कोल्हापूर, सिंधुदुर्ग, नाशिकसह अनेक ठिकाणी काल पाऊस झाला. सिंधुदुर्गात सलग तिसऱ्या दिवशी जिल्ह्याला अक्षरशः झोडपून काढले आहे.
हेही वाचा - हवामान बदलामुळे ऐन दिवाळीत कोकण आणि मध्य महाराष्ट्रात पडणार पाऊस?