मुंबई - मुसळधार पाऊस आणि अतिवृष्टीमुळे राज्यातील सुमारे 27 हजार विद्यार्थ्यांना सीईटी परीक्षेला बसता आले नव्हते. राज्य सरकारने ही बाब विचारात घेत, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा संधी उपलब्ध करून दिली आहे. येत्या नऊ आणि दहा ऑक्टोबर रोजी या परीक्षा होतील, अशी माहिती उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांनी पत्रकार परिषदेत दिली. तसेच या काळातील काही अडचणी निर्माण झाल्यास १५ तारखेपर्यंत फेर परीक्षा घेण्यात येणार असल्याचे ते म्हणाले.
- परीक्षा केवळ नोंदणीकृत विद्यार्थ्यांसाठी -
राज्यात गेल्या दोन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडत आहे. पश्चिम महाराष्ट्र, कोकण, खान्देश, विदर्भ, मराठवाडा भागात अतिवृष्टी झाली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात शेतीचे नुकसान, जीवितहानी आणि वित्तहानी झाली आहे. महाराष्ट्रातील बऱ्याच विद्यार्थ्यांना पावसामुळं सीईटी परीक्षा देता आली नाही. राज्य सरकारने या विद्यार्थ्यांना दिलासा देण्यासाठी सीईटी परीक्षा पुन्हा एकदा घेण्याचा निर्णय घेतला आहे. ज्या विद्यार्थ्यांचे रजिस्ट्रेशन झाले आहे, त्यांच्या पुन्हा परीक्षा घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत. त्यानुसार या परीक्षांचे नियोजन पुन्हा एकदा करण्यात येणार असून विभागाला सूचना दिल्या आहेत, अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली.
- या कारणामुळे मिळणार पुन्हा संधी -
टीईटी आणि आरोग्य सेवा भरतीची परीक्षा ९ आणि १० ऑक्टबरला होणार आहेत. याच दिवशी सीईटी परीक्षा घेतली जाणार आहे. परीक्षा केंद्रांवर त्याचा काहीही परिणाम होणार नाही. सीईटीकडे स्वतंत्र यंत्रणा आहे. यावेळी पुन्हा तांत्रिक अडचणी, नैसर्गिक आपत्ती, पूरस्थिती, कोरोना आणि साथीच्या आजारचा संसर्ग, घरात वाईट घटना घडल्यास, स्लीपिंग किंवा अन्य कारणामुळे वाहतूक कोंडी झाल्यास नोंदणीकृत विद्यार्थ्यांना परीक्षेची पुन्हा संधी देण्यात येईल, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. मात्र विद्यार्थ्यांनी या कारणांचा गैरफायदा घेतल्यास तपास करून त्यांच्यावर कठोर कारवाई केली जाईल. शिवाय भविष्यात त्यांना सीईटी परीक्षा देण्यास बंदी घातली जाईल, असेही सामंत यांनी स्पष्ट केले. आरोग्य सेवेचा भरती प्रक्रिया प्रमाणे कोणताही गोंधळ होणार नाही, याची पुरेपूर काळजी घेतल्याचे त्यांनी सांगितले.
हेही वाचा - न्यायालयाने फेटाळला विनंती अर्ज, सचिन वाझेची तळोजा कारागृह रुग्णालयात रवानगी