मुंबई - मध्य रेल्वेवर सध्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी 431 रेल्वे गाड्यांच्या फेऱ्या सुरू आहेत. त्यात आता 22 अतिरिक्त फेऱ्यांची वाढ करण्यात आली आहे. मुख्य मार्गावर 18 आणि हार्बर मार्गावर 4 विशेष अशा एकूण 22 फेऱ्या असणार आहेत.
महाराष्ट्र शासनाने अधिसूचित केल्यानुसार मध्य रेल्वे सध्या कर्मचार्यांसाठी 432 विशेष उपनगरीय लोकलच्या फेऱ्या सुरू आहेत. सोशल डिस्टन्सिंग कायम ठेवण्यासाठी व गर्दी टाळण्यासाठी मध्य रेल्वेने 10 ऑक्टोबरपासून दैनंदिन विशेष उपनगरीय लोकल फेऱ्यांची संख्या 431 वरुन 453 पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. सध्याच्या 431 विशेष उपनगरीय लोकलच्या फेऱ्यांच्या वेळापत्रकात कोणताही बदल झालेला नाही.
अतिरिक्त 22 फेऱ्यांचे खाली नमूद केल्याप्रमाणे स्थानकांवर थांबे असतील:
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कसारा विशेष थानशेत आणि उंबरमाळी वगळता इतर सर्व स्थानकांवर थांबतील.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस - कर्जत विशेष शेलू सोडून इतर सर्व स्थानकांवर थांबतील.
छत्रपती शिवाजी महाराज - पनवेल विशेष रे रोड, कॉटन ग्रीन, किंग्ज सर्कल, चुनाभट्टी आणि मानसरोवर स्थानक वगळता इतर सर्व स्थानकांवर थांबतील.
महाराष्ट्र शासनाने परवानगी दिलेल्या सर्व प्रवाशांना रेल्वे स्टेशनवर, गाडीत चढताना व उतरताना आणि विशेष उपनगरीय गाड्यांमध्ये प्रवास करताना सोशल डिस्टन्सिंगचे निकष पाळण्याची आणि मास्क घालण्याची विनंती केली जात आहे.