मुंबई - उपलब्ध असलेल्या लसीच्या साठ्यावरून राज्य सरकार आणि केंद्र सरकारमध्ये वाद निर्माण झालेला आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी राज्यात तीन दिवस पुरेल इतकाच लसीचा साठा आहे अशी माहिती दिली होती. त्याबरोबर केंद्राकडून योग्यप्रकारे लसीचा पुरवठा होत नाही, अशी तक्रारही त्यांनी केली होती. मात्र या प्रकरणावर केंद्रीय आरोग्य मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी महाराष्ट्र सरकारवर टीका केलेली आहे. "डॉ. हर्षवर्धन यांच्याकडून आम्हाला अशी अपेक्षा नाही. महाराष्ट्र सरकार काय करत आहे? हे अख्ख जग पाहत आहे" असे प्रत्युत्तर शिवसेना नेते संजय राऊत यांनी दिले आहे.
केंद्र आणि राज्याने एकमेकांवर टीका न करता जनतेची सेवा केली पाहिजे
"महाराष्ट्र सरकार काही लपवत नाही. महाराष्ट्राला खालीपणा दाखवून संकटामध्ये आणण्याचा हा प्रयत्न आहे. डॉक्टर हर्षवर्धन यांच्याकडून आम्हाला ही अपेक्षा नाही. महाराष्ट्र सरकार काय करत आहे? हे अख्ख जग पाहत आहे. महाराष्ट्र एक मोठे राज्य असून त्यावर आर्थिक, लस, वाढती रुग्णसंख्या अशा अनेक गोष्टींचा दबाव आहे. केंद्र आणि राज्याने एकमेकांवर टीका-टिप्पणी न करता जनतेची सेवा केली पाहिजे", असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले होते हर्षवर्धन?
"लसींचा तुटवडा असल्यासंदर्भात महाराष्ट्रातील लोकप्रतिनिधींकडून केली गेलेली विधाने म्हणजे करोना आटोक्यात आणण्यामध्ये राज्य सरकारला आलेल्या अपयशापासून लोकांचे लक्ष दुसरीकडे वळण्याचा प्रयत्न असल्याचे दिसते. राज्यात करोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यात राज्य सरकार अपयशी ठरले आहे. त्यात लससाठ्यावरून लोकांमध्ये घबराट निर्माण करणे म्हणजे समस्येत आणखी भर घालण्यासारखे आहे", अशा शब्दांत हर्षवर्धन यांनी आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिले होते.
हेही वाचा - Live Updates: अनिल देशमुख यांना दिलासा मिळणार का? सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू
हेही वाचा - "लसीकरण करा, तब्बल पाच लाख मिळवा," वर्धा जिल्ह्यात अभिनव योजना