मुंबई - क्रूझ ड्रग्ज प्रकरणात आर्यन खानला सोडण्यासाठी २५ कोटींच्या खंडणी प्रकरणात अभिनेता शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानीचा एक सीसीटीव्ही व्हिडिओ मुंबई पोलिसांच्या हाती लागला आहे. मुंबईच्या लोअर परळ भागातील हे सीसीटीव्ही फुटेज असून याच ठिकाणी २५ कोटींच्या खंडणीचे डील झाल्याचा गौप्यस्फोट प्रभाकर साईल याने केला होता. त्या ठिकाणाचे सीसीटीवी फुटेज मुंबई पोलिसांच्या हाती लागल्या असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मात्र अद्याप हे सीसीटीव्ही फुटेज मीडियाला मिळाले नाही.
दरम्यान आर्यनला या प्रकरणात अडकवलं जात असल्याचं सांगण्यात आलं होतं. आता याप्रकरणी महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जेव्हा खान कुटुंब संकटात होतं तेव्हा त्यांच्यासोबत असणारी शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. पूजा दलानीचे लोअर परळमधील सीसीटीव्ही फुटेज विशेष तपास पथाकाच्या (एसआयटी) हाती लागले आहे.
मुंबई पोलिसांच्या एसआयटीने शोधलेल्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये, लोअर परळच्या बीग बाजार येथे निळ्या रंगाची एक मर्सिडीज आणि दोन इनोव्हा कार दिसतात. यातील निळ्या रंगाची मर्सिडीज ही शाहरुखची मॅनेजर पूजा ददलानी हिची असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत असून इतर दोन इनोव्हा कार या पंच किरण गोसावी आणि सॅम डिसूझा यांच्या असल्याचा संशय आहे. तसेच निळ्या मर्सिडीजमधून एक महिला खाली उतरते आणि दुसऱ्या कारजवळ असलेल्या व्यक्तीशी गप्पा मारताना दिसत असून नंतर ती पुन्हा आपल्या कारजवळ जाताना दिसत आहे. ही महिला पूजा ददलानी असून ती किरण गोसावीशी गप्पा मारत असल्याचा संशय व्यक्त करण्यात येत आहे. त्यावेळी तिथे सॅम डिसूझा आणि प्रभाकर साईल देखील उपस्थित असल्याचे दिसत आहे. या प्रकरणाची येत्या २-३ दिवसात चौकशी होईल असे सांगण्यात येत आहे त्याचप्रमाणे पोलिसांनी आता नवी मुंबई, ताडदेवमधील काही सीसीटीव्ही फुटेज देखील तपासण्यास सुरुवात केली आहे.
प्रभाकर साईलचे आरोप काय
आर्यन खान प्रकरणात साक्षीदार असलेल्या प्रभाकर साईलने प्रतिज्ञापत्रं दाखल केलं आहे. त्यात त्यांनी अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. के.पी. गोसावी आणि सॅम डिसूझाचे मी फोनवरील संभाषण ऐकले होते. 25 कोटींचा बॉम्ब टाका. 18 कोटीपर्यंत डील फायनल करू. त्यातील 8 कोटी रुपये समीर वानखेडेंना देऊ असे या दोघांमध्ये संभाषण झाल्याचा साईल यांचा दावा आहे. आपण के.पी गोसावी यांचे बॉडीगार्ड असल्याचा दावाही साईल यांनी केला आहे.
साईलने पत्रकार परिषद घेत सांगितले होते, की 'गोसावीने मला फोन केला आणि पंच म्हणून राहण्यास सांगितले. एनसीबीने 10 कोऱ्या कागदांवर माझी सही घेतली. तसेच मी गोसावींना 50 लाखांच्या दोन बॅगाही दिल्या होत्या,' असंही प्रभाकर साईलनी सांगितलं. 1 ऑक्टोबर रोजी रात्री 9 वाजून 45 मिनिटाने गोसावीने मला फोन केला होता. तसेच 2 ऑक्टोबर रोजी 7.30 वाजेपर्यंत तयार राहण्यास मला सांगण्यात आले. गोसावींनी मला काही फोटोही पाठवले होते. फोटोत जे लोक दिसत आहेत, ग्रीन गेटवर याच लोकांची ओळख पटवण्यास सांगितल्याची धक्कादायक माहितीही साईल यांनी दिली होती.
हेही वाचा - आर्यन खानला 'कस्टडी'त भेटणारी, 'सुटके'साठी तळमळणारी, कोण आहे ही 'भावूक' होणारी पूजा?