मुंबई - सुशांतसिंह राजपूत प्रकरणी सीबीआय, ईडी व नार्कोटिक कंट्रोल ब्युरोकडून तपास सुरू असताना अनेक माध्यमांमध्ये वेगवेगळ्या बातम्या दिल्या जात आहेत. याला अनुसरून सीबीआयकडून एक प्रसिद्धीपत्रक जाहीर करण्यात आले आहे. यामध्ये संबंधित बातम्या वस्तूस्थितीला धरून नसल्याचे सीबीआयने स्पष्टीकरण दिले आहे.
सीबीआयकडून सुशांत सिंह राजपूत मृत्यू संदर्भात चौकशी सुरू असून काही माध्यमांमध्ये या संदर्भात वेगवेगळ्या बातम्या येत आहेत. मुळात या बातम्या वस्तुस्थितीला धरून नसून सीबीआयच्या पॉलिसी नुसार सुशांत सिंह राजपूत मृत्यूच्या संदर्भात तपासाचा तपशील कोणताही सीबीआय अधिकारी किंवा सीबीआयच्या प्रवक्त्याकडून माध्यमांना दिली जात नाही, असे सांगण्यात आले आहे. माध्यमांमध्ये सुशांत सिंहच्या मृत्यू संदर्भात येणाऱ्या बातम्या या वस्तुस्थितीला धरून नसल्याचंही सीबीआय कडून स्पष्ट करण्यात आलंय.
दरम्यान , सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणी मीडिया ट्रायल सुरू असून यामुळे जाणून-बुजून मुंबई पोलिसांची छबी ही खराब केली जात असल्याचं म्हणत मुंबई पोलीस खात्यातील माजी आयपीएस अधिकाऱ्यांनी मुंबई उच्च न्यायालयामध्ये 31 ऑगस्ट रोजी दाखल केलेल्या याचिकेवर गुरुवारी सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने सुशांत सिंह प्रकरणी वार्तांकन करणाऱ्या वृत्तवाहिन्यांनी संयम बाळगून वार्तांकन करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच तपासात कुठेही बाधा होणार नाही, अशा प्रकारचे वार्तांकन करण्यापासून स्वतःला रोखावे, असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत.