मुंबई - शहरात मंगल कार्यालये, समारंभ, कार्यक्रम आदी ठिकाणी होणाऱ्या गर्दीमुळे कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे समोर आले आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी पालिकेने गर्दी होणाऱ्या ठिकाणी धाडी टाकून गुन्हे नोंदवायला सुरूवात केली आहे. त्याचवेळी मंगल कार्यालयातील कॅटरर्स वाल्यानी महापौरांची भेट घेतली आहे. आमचा धंदा बुडत असल्याने ५० ऐवजी मंगल कार्यालयाच्या क्षमतेच्या ५० टक्के लोकांना उपस्थित राहण्यास परवानगी द्यावी अशी मागणी करण्यात आली आहे. यावर आठ ते दहा दिवसांनी मुख्यमंत्र्यांशी बोलण्याचे आश्वासन महापौरांनी दिले आहे.
गर्दी करण्याची मुभा द्या -
मुंबईत गेले अकरा महिने करण्यात आलेल्या प्रयत्नानंतर कोरोना आटोक्यात आला. मात्र, मंगल कार्यालये, समारंभ, नागरिकांची गर्दी, लोकल ट्रेनमध्ये होणारी गर्दी यामुळे पुन्हा कोरोना वाढला. गर्दी होणाऱ्या ठिकाणी कोरोनाचा प्रसार होऊ शकतो म्हणून राज्य सरकाराच्या आदेशानुसार पालिकेने कार्यक्रमाला ५० जणांची उपस्थितीला मान्यता दिली आहे. मात्र, ५० जण उपस्थित राहिले तर आमचा धंदा होणार नाही. आमच्या धंद्यावर ७० हजार लोक अवलंबून आहेत. ज्या प्रमाणे सिनेमागृह आणि नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरु आहेत, त्याचप्रमाणे मंगल कार्यालयांमध्ये ५० टक्के लोकांना उपस्थित राहण्याची परवानगी दिल्यास आमचा धंदा चांगला होईल. सोशल डिस्टनसिंगचे आम्ही पालन करू, बुकिंग करणाऱ्या पार्टीलाही आम्ही तसे सांगू असा युक्तिवाद कॅटरर्सवाल्यांकडून करण्यात आला आहे.
मुख्यमंत्र्यांशी बोलणार -
यावर सध्या मुंबईत कोरोना वाढत आहे. अशावेळी गर्दी झाली तर कोरोनाचा प्रसार होईल म्हणून पुढील आठ ते दहा दिवस आम्ही वाट पाहत आहोत. जर रुग्णसंख्या वाढली तर पुन्हा पहिल्यासारखा लॉकडाऊन लावावा लागेल. मुख्यमंत्र्यांनी मी जबाबदार ही मोहीम सुरु केली आहे. लॉकडाऊन लावायचा नसेल तर नागरिकांनी कोरोना संदर्भातील नियम पाळण्याची गरज आहे. लग्नामध्ये नियम पळाले जात नाहीत याचा त्रास कॅटरर्स मालकांना होता कामा नये, आयोजकांवर गुन्हे नोंदवावेत यासाठी पालिका प्रशासनाला निर्देश देऊ असे महापौर म्हणाल्या. कोरोना रुग्णसंख्या वाढली नाही तर मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन प्रश्न मांडू असे आश्वासन महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिले आहे.