मुंबई - उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या अँटिलिया घराजवळ स्फोटके असणारी गाडी आढळल्याने गुरुवारी रात्री मुंबईमध्ये एकच खळबळ उडली. कंबाला हिल परिसरातील अंबानी यांच्या घराजवळ स्फोटक साहित्याने भरलेली एक स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. या गाडीमध्ये जिलेटिन स्फोटकांच्या 20 कांड्या होत्या अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेनंतर अंबानी यांच्या घराबाहेरील बंदोबस्त वाढवण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास क्राईम ब्राँचकडून सुरु करण्यात आला आहे. यासंदर्भात आज दिवसभरात घडलेल्या घडामोडींवर टाकुयात एक नजर....
तपासासाठी मुंबई पोलिसांकडून 10 पथके तयार
या प्रकरणाच्या तपासासाठी मुंबई पोलिसांकडून 10 तापस पथके बनवण्यात आली आहेत. प्रत्येक पथकाला वेगवेगळी कामे वाटून देण्यात आली आहेत. पोलीस खात्यातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पहिल्या पथकाकडे पेडर रोडच्या परिसरात असलेल्या सर्व सीसीटीव्ही फुटेज एकत्रित करण्याचे काम देण्यात आले आहे. यामध्ये पेडर रोड परिसरात असलेल्या सर्व हाउसिंग सोसायटी यांचेही सीसीटीव्ही फुटेज या पथकाकडून गोळा केले जात आहेत. तर दुसऱ्या तपास पथकाकडे मुंबई ट्राफिक पोलिसांच्या मुख्यालयातील सीसीटीव्ही फुटेज स्कॅन करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. मुंबईत दाखल झालेली ही स्कॉर्पिओ गाडी कुठे आणि कशा प्रकारे फिरली याचा पूर्ण तपास करण्याची जबाबदारी या पथकाकडे देण्यात आली आहे. तिसऱ्या पथकाकडून मुंबई पोलिसांचा मुख्यालय व क्रॉफर्ड मार्केट परिसरात असलेल्या सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम देण्यात आले आहे. चौथ्या टीमकडे त्याच्या आजूबाजूच्या परिसरात असलेल्या संशयित लोकांची माहिती गोळा करण्याचे काम देण्यात आलेले आहे. तसेच पाचव्या तपास पथकाकडे फॉरेन्सिकच्या पथकासोबत मिळून काम करण्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे. तसेच संशयित व्यक्तींच्या संदर्भात पुरावे गोळा करण्याचे काम यांच्याकडे देण्यात आले आहे.
स्कॉर्पिओ कार विक्रोळीतून झाली होती चोरी
मुकेश अंबानी यांच्या इमारतीबाहेर थोड्या अंतरावर एक स्कॉर्पिओ कार स्फोटकांसह आढळली होती. ही गाडी आणि ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर 18 फेब्रुवारीला विक्रोळी पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरी झालेली गाडी एक असल्याची माहिती आता समोर आली आहे. ठाण्याच्या एका ऑटोमोबाईल दुकान मालकाची ती गाडी असल्याची माहिती आहे. 17 तारखेला संध्याकाळी या गाडीचा मालक मुंबईत जात असताना ईस्टर्न एक्सप्रेस महामार्गावर ही गाडी बंद पडली होती. त्यामुळे ती गाडी तशीच त्या ठिकाणी उभी करून मालक निघून गेला. यानंतर 18 तारखेला दुपारी एक वाजता मेकॅनिकला घेऊन आला तर गाडी चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यानंतर याप्रकरणी विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती.
एटीएसने सुरू केली मुकेश अंबानींच्या घराजवळील सीसीटीव्हींची तपासणी
या प्रकरणातील संशयित दोन गाड्या पकडण्यासाठी पोलीस आणि एटीएसने सर्वात प्रथम ट्रफिक सिग्नल आणि अंबानींच्या घराच्या आसपास असणारे सर्व सीसीटीव्ही तपासण्यास सुरुवात केली आहे. या गाड्या दुसऱ्या राज्यातून आल्या होत्या की राज्यातीलच आहेत, याबाबत शोध सुरू आहे. मुंबई पोलिसांना एका गाडीमध्ये अनेक नंबर प्लेट मिळाल्या आहेत. या नंबर प्लेटवरील नंबर अंबानींच्या सुरक्षा ताफ्यातील गाड्यांशी साधर्म्य असणाऱ्या आहेत. वरिष्ठ पोलीस अधिकारी विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आहे. एटीएस पथकाकडून घटनास्थळाची पाहणी करण्यात आली आहे.
जिलेटिन कांड्यांचे नागपूर कनेक्शन
मुकेश अंबानी यांच्या घराजवळ स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ गाडी आढळून आली. याप्रकरणाचे नागपूर कनेक्शन समोर येत आहे. या गाडीमध्ये आढळून आलेले इमलशन एक्सप्लोजीव अर्थात जिलेटिन कांड्यांची निर्मिती नागपूरमधील सोलर एक्सप्लोजीव लिमिटेड कंपनीमध्ये झाल्याची माहिती समोर आली आहे.
जिलेटिन कांड्यांबद्दल माहिती देतायेत तज्ज्ञ
या स्कॉर्पिओमध्ये जी स्फोटके सापडली आहेत, त्या स्फोटकाला जोपर्यंत ब्लास्टिंग डिव्हाईस जोडले जात नाही, तोपर्यंत त्याचा स्फोट होऊ नकत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. तसेच हे एक्सप्लोजीव कंपनीकडून जेव्हा बाहेर पडतात तेव्हा ते एका प्रोटोकॉलनुसार बाहेर पडत असतात, ही स्फोटके कुठे जाणार आहेत, ते कशासाठी वापरण्यात येणार आहेत, याची सर्व नोंद कंपनीकडे असते. ही स्फोटके 25 किलोंच्या बॉक्समध्ये पॅक केली जातात, मात्र हे एकदा त्या बॉक्समधूम काढले गेले की त्याचा वापर कसा होतो, ते कुठे जातात हे सांगता येणार नाही. अशाच बॉक्समधून ही स्फोटके काढून कोणीतरी त्याचा दुरपयोग केल्याचा संशय सोलर एक्सप्लोजीव लिमिटेडचे चेअरमन सत्यनारायण नुवाल यांनी व्यक्त केला आहे.
अंबानी कुटुंबियांना पत्रातून धमकी -
या गाडीमध्ये एक पत्र मिळाले आहे. त्यामध्ये 'डिअर नीता भाभी और मुकेश भैया और फॅमिली ये तो सिर्फ ट्रेलर है, अगली बार सामान पुरा होकर आयेगा तुम्हारी पुरी फॅमिली को उडाने के लिए समज जाणा' अशा प्रकारचा मजकूर या पत्रामध्ये दिलेला आहे.