मुंबई - अखिल भारतीय व्यापारी संघटनेने (सीएआयटी) केंद्रीय वाणिज्यमंत्री पीयूष गोयल यांना पत्र लिहून ई-कॉमर्स कंपनी अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टवर कारवाई करण्याची मागणी केली आहे. कोरोनाच्या काळात निर्बंध असतानाही या ई-कॉमर्स कंपन्यांकडून बिगर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात असल्याचा सीएआयटीने आरोप केला आहे.
कोरोना महामारीच्या काळाचा ई-कॉमर्स कंपन्यांकडून गैरफायदा घेतला जात आहे. अनेक राज्यांत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी टाळेबंदी जाहीर करण्यात आली आहे. तरीही ई-कॉमर्स कंपन्यांकडून बिगर जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा केला जात असल्याचे सीएआयटीने म्हटले आहे. याबाबत पत्र व्यापारी संघटनेचे महासचिव प्रवीण खंडेलवाल यांनी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांना लिहिले आहे.
हेही वाचा-'लस उपलब्ध नसेल तर, 1 मेपासून सुरू होणारी लसीकरण मोहीम राबवायची कशी'
काय म्हटले आहे पत्रात ?
- ई-कॉमर्स कंपन्यांकडून महामारीच्या काळात लहान व्यापारांचा बाजारपेठेतील हिस्सा बळकाविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा व्यापारी संघटनेने दावा केला आहे. त्यासाठी ई-कॉमर्स कंपन्यांकडून मोबाईल फोन आणि त्यांचे अॅसेसरीजही जीवनावश्यक असल्याचे म्हटले जात आहे.
- केंद्र सरकारने कशाला परवानगी आहे, कशावर निर्बंध आहे, याची स्पष्ट माहिती देणारी प्रसिद्धी पत्रक काढावी, असी सीएआयटीने मागणी केली आहे.
- ही प्रक्रिया त्वरित करून स्थानिक उद्योगांना विदेशी उद्योगांपासून वाचवावे, अशी व्यापारी संघटनेने पत्रातून केंद्रीय मंत्री गोयल यांच्याकडे मागणी केली आहे.
- ई-कॉमर्स कंपन्या या मोठ्या कंपन्या असल्याने त्यांनी नियमांचे उल्लंघन करूनही सरकार त्यांच्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोपही सीएआयटीने केला आहे.
हेही वाचा- रशियाची 'स्पूटनिक व्ही' लस मे अखेर भारतामध्ये उपलब्ध होणार
दरम्यान, ई-कॉमर्स कंपन्यांकडून नियमांचे उल्लंघन होत असल्याचा आरोप वारंवार सीएआयटीने आजवर केले आहेत. कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने बहुतांश राज्यांनी बिगर जीवनावश्यक वस्तुंच्या विक्रीवर वेळेची मर्यादा घालून दिली आहे.