मुंबई:अरुंद रस्ते रस्त्यांच्या दुतर्फा अनधिकृत पार्किंग यामुळे मुंबईत वाहतूक कोंडीची समस्या निर्माण होते. यावर उपाय म्हणून बेवारस वाहने जप्त करून ती पालिकेच्या वॉर्ड स्तरावर असलेल्या गोदामात जमा करण्यात येतात. आतापर्यंत 3700 हून अधिक बेवारस वाहने जप्त करण्यात आली आहेत. मात्र बेवारस वाहनांची संख्या मोठी असल्याने काही वॉर्डमध्ये वाहने जमा करण्यासाठी जागा शिल्लक नाही. त्यामुळे दोन ठिकाणी वाहनांसाठी डम्पिंग ग्राउंड सुरू करण्यासाठी पालिकेने कारवाई सुरू केली आहे. त्यातील एका डम्पिंगसाठी माहुलमध्ये एक हेक्टर जागा उपलब्ध झाल्याचे पालिका प्रशासनाने स्पष्ट केले आहे.
रस्त्यावर बेवारस वाहन दिसल्यास गाडीवर नोटीस लावण्यात येते. नंतर कारवाई होते त्यानंतरही एका महिन्यात गाडी मालक आला नाही तर त्या गाडीचा रीतसर लिलाव करण्यात येणार आहे. मुंबईतील रस्त्यांनी मोकळा श्वास घ्यावा हा या कारवाईचा उद्देश असल्याचे पालिकेचे अतिरिक्त आयुक्त संजीव कुमार यांनी सांगितले. मुंबई व उपनगरात पालिकेच्या 32 सार्वजनिक वाहनतळावर मुंबई वाहतूक पोलिसांना मदत करण्यासाठी विदर्भ इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे टोइंग व्हॅन आहेत. दुचाकीसाठी 24 तर मोटारींसाठी 22 टोइंग व्हॅन आहेत. दुचाकीसाठी जय मल्हार कंपनीच्या 60 टोइंग मोटारींसाठी 29 टोइंग व्हॅन आहेत.