मुंबई - गेल्या वर्षीच्या मार्चपासून कोरोनाचा प्रादुर्भाव आहे. या प्रादुर्भावादरम्यान मुंबईत मृत्यूदर 5 टक्के होता. रोज 30 ते 40 रुग्णांचा मृत्यू होत होता. पालिका प्रशासनाने केलेल्या उपाययोजनांमुळे ही मृत्यूची संख्या कमी झाली असून आता दिवसाला 3 ते 5 मृत्यू होत आहेत. पालिकेच्या आरोग्य विभागाने केलेल्या प्रयत्नामुळे मुंबईतील मृत्यूदर 3.50 टक्के इतका करण्यात महापालिकेला यश आले आहे.
कोरोनारुग्ण आणि मृत्यूची आकडेवारी
मुंबईत 11 मार्चला कोरोनाचा पहिला रुग्ण आढळून आला. 17 मार्चला कोरोनामुळे मुंबईत पहिला मृत्यू झाला. तेव्हापासून 2 मार्चपर्यंत मुंबईत एकूण 3 लाख 27 हजार 619 रुग्णांची नोंद झाली आहे. 3 लाख 5 हजार 639 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. तर 11 हजार 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 9 हजार 936 मृत्यू हे 50 वर्षावरील नागरिकांचा झाला आहे. मुंबईत सध्या 3.50 टक्के इतका मृत्यूदर आहे. आतापर्यंत मुंबईत 11 हजार 476 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यापैकी 50 वर्षावरील 9 हजार 936 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
दरदिवशी होणाऱ्या मृत्यूची आकडेवारी
मागील वर्षी 1 मेला दिवसाला 5, 1 जूनला दिवसाला 40, 1 जुलैला दिवसाला 6, 1 ऑगस्टला दिवसाला 45, 1 सप्टेंबरला दिवसाला 35, 1 ऑक्टोबरला दिवसाला 43, 1 नोव्हेंबरला दिवसाला 25, 1 डिसेंबरला दिवसाला 9, 1 जानेवारीला दिवसाला 9, 1 फेब्रुवारीला दिवसाला 8, 10 फेब्रुवारीला दिवसाला 4, 20 फेब्रुवारीला दिवसाला 3, 28 फेब्रुवारीला दिवसाला 5, 1 मार्चला 4, 2 मार्चला 2 तर 3 मार्चला 6 मृत्यूची नोंद झाली आहे. ही आकडेवारी पाहता दरदिवशी होणाऱ्या मृत्यूच्या संख्येत घट होत असल्याचे दिसत आहे.
करण्यात आल्या या उपाययोजना
मुंबईत कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यावर मृत्यू होण्यासही सुरुवात झाली. कोरोनादरम्यान विविध आजारांनी त्रस्त असलेल्या रुग्णांचा मृत्यू होत होता. यासाठी हे मृत्यू रोखण्यासाठी विशेष लक्ष ठेवण्यात आले. महापालिका रुग्णालयात रात्रीच्या वेळेस रुग्ण शौचालयात जाताना पडून मृत्यू झाल्याचे प्रकार निदर्शनास आले. त्यासाठी रुग्णांना बेडवर शौचालयाचे पॉट देण्यात आले. जे मृत्यू होतील त्याचे डेथ ऑडिट करण्याचे आदेश देऊन डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांवर जबाबदारी निश्चिती करण्यात आली. रुग्ण हे आपले कुटुंबीय आहेत हे समजून त्यांची सेवा करण्याचे आदेश देण्यात आल्याने मृत्यूची संख्या कमी करण्यात यश आल्याची माहिती पालिका आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.