मुंबई - निर्माता एकता कपूरची सैनिकांवर असलेली वेबसिरीज वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. एकता कपूरच्या वेबसिरीजमध्ये सैनिकांचा अपमान झाला, तो आम्ही सहन करणार नाही, असा इशारा माजी खासदार ब्रिगेडियर सुधीर सावंत यांनी दिला. सुधीर सावंत यांनी या वेबसिरीजला विरोध केला असून वेबसिरिजही सेन्सॉर बोर्डाच्या निर्बंधांत यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
सैनिक हा कुठल्या पैशासाठी लढत नाही. कोणत्या नोकरीसाठी लढत नाही. तो सन्मानासाठी लढतो. देशाच्या हितासाठी लढतो. हे जवानांचे काम आहे आणि त्यांच्या चरित्राला ठेच पोहोचवली जात आहे. सैनिक सिमेवर लढतो आणि इथे घरात बसून वेबसिरीजद्वारे त्यांचा अपमान होत असेल तर हा देशद्रोह आहे, असे सावंत म्हणाले.
जे सैनिक पूर्णवेळ देशाचे संरक्षण करतात, त्यांच्या गैरहजेरीमध्ये त्यांच्या घरात त्यांची पत्नी ही गैरप्रकार करते, असे यात दाखविण्यात आले आहे. एवढ्यावरच ते थांबले नाहीत, तर युनिफॉर्म घातलेला आणि ते युनिफॉर्म फाडलेले असे चित्र दाखवण्यात आले. त्या युनिफॉर्मवर अशोक चक्र होते. हे पूर्णपणे देशद्रोहाचे काम आहे, असेही सावंत म्हणाले.