मुंबई - देशातील सर्वाधिक ऐतिहासिक आणि वर्दळीचे रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai) गेल्या काही दिवसांपासून बूट पाॅलिश कामगार (boot polish workers) गायब झाले आहेत. रेल्वे स्थानकांत यावर चर्चा रंगली असून याबाबत ईटीव्ही भारतने आढवा घेतला असता, स्थानकावरील बूट पॉलिश कामगारांची अधिकृत नोंदणीच झाली नसल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. रेल्वेने देखील यानंतर बूट पॉलिश कामगारांसोबतचा करार रद्द केले आहेत. त्यामुळे सरकारी, खासगी अधिकारी व कर्मचाऱ्यासोबतच सामान्य प्रवाशांचे बूट पाॅलिशचे वांदे झाले आहेत.
इतिहासात पहिल्यांदाच बूट पॉलिशवाले गायब -
कोरोनानंतर तब्बल दीड वर्षानंतर मुंबईची लाइफलाईन अर्थात लोकलमध्ये हळूहळू गर्दी वाढू लागली आहे. रेल्वेवर अवलंबून असलेल्या रोजगाराची चाके देखील गतिमान होण्यास सुरुवात झाली आहेत. प्रवाशांची वर्दळ पुन्हा स्थानकात सुरू झाल्याने बूट पॉलिश कामगार, खाद्यपदार्थ स्टॉलधारक,फळविक्रेते अशा सर्वांना दिलासा मिळाला होता. मात्र, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनलसवर (Chhatrapati Shivaji Maharaj Terminus Mumbai) बूट पॉलिश कामगारांना (boot polish workers) गेल्या काही दिवसापूर्वी मोठा झटका बसला आहे. बूट पॉलिश कामगारांच्या आयुष्याची चमक गेली आहे. कारण त्यांच्या सोसायटीची नोंदणी नसल्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्यांचा करार रद्द केला आहे. यामुळे सीएसएमटी स्थानकातून इतिहासात पहिल्यांदाच बूट पॉलिश कामगार हद्दपार झाला आहे.
काय आहे प्रकरण ?
याबाबत मध्य रेल्वेच्या वरिष्ठ मंडळ वाणिज्य व्यवस्थापक गौरव झा यांनी ईटीव्ही भारतला सांगितले की, २०१६ मध्ये सीएसएमटी स्थानकातील बूट पॉलिश कामगारांचा सोसायटी बरोबर करार केला होता. त्यानंतर कोरोना काळात बूट पाॅलिश कामगारांचा करार संपुष्टात आलेला होता. यानंतर पुन्हा एकदा बूट पॉलिश कामगारांबरोबर करार करतेवेळी सोसायटीची फेर नोंदणी झाली नव्हती. याबाबत रेल्वेकडून दोनवेळा स्मरणपत्र बूट पॉलिश कामगारांना सुद्धा दिले होते. तरी सुद्धा त्यांनी नोंदणी केली नव्हती. अखेर आम्हाला बूट पॉलिश कामगारांना स्थानकावरून हटवावे लागले आहे.
२५ बूट पॉलिश कामगारांवर उपासमारी -
कोरोनापूर्वी मुंबई विभागातील मध्य आणि पश्चिम रेल्वे बूटपॉलिश करणाऱ्या कामगारांची संख्या सरासरी ६०० इतकी होती. मात्र, कोरोनामुळे लोकल सेवेवर निर्बंध आल्यामुळे हातावर पोट असणाऱ्या बूटपॉलिश कामगारांचा धंदा कमी झालेला होता. परिणामी कुटुंबाचा उदरनिर्वाह सुद्धा व्यवस्थित होत होता. त्यामुळे अनेकांनी बूट पॉलिश करण्याचा व्यवसाय सोडून गाव गाठले होते. आज मध्य आणि पश्चिम रेल्वे लाईनवर जवळपास ४५० बूटपॉलिश कामगार कार्यरत आहेत. आज मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर सुमारे २५ बूट पॉलिश कामगार कार्यरत होते. मात्र आता सीएसएमटी स्थानकातील या बूट पॉलिश कामगारांची अधिकृत नोंदणीच नसल्याने त्यांना स्थानकावरून हटविण्यात आले आहे.
रेल्वे आम्हाला बसू देत नाही -
सीएसएमटी रेल्वे स्थानकांवर बूट पॉलिश करणाऱ्या दयानंद राम यांनी सांगितले की, कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत गेला. तेव्हा लोकल प्रवासांवर निर्बंध घातल्यामुळे प्रवासी संख्येत कमालीची घट झाली आहेत. गेल्या काही दिवसांपासून दोनशे रुपयांच्या दररोज व्यवसाय सुद्धा होत नाही. त्यात रेल्वेला एक हजार रुपये भाडे प्रति महिन्याला द्यावे लागत आहे. मुंबई शहरातील कार्पोरेट कार्यालये सुद्धा गेल्या एका वर्षांपासून वर्क फॉर्म होम आहेत. परिणामी आमच्या व्यवसायाला मोठा फटका बसलेला आहे. तरीही आम्ही स्थानकांवर पोट भरण्यासाठी काम करत होतो. आता नोंदणी नसल्याने रेल्वे आम्हाला स्थानकांवर बसू देत नाही. त्यामुळे आम्ही आता गावी आलो आहे. यासबंधी आम्ही सीएसएमटीचा बूट पॉलिश सोसायटीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला. मात्र आमचा प्रयत्न होऊ शकला नाही.
त्याच्या हाताची चमक काही वेगळीच-
सीएसएमटी स्थानकावरून बूट पाॅलिशवाले अचानक गायब झाल्याने प्रवाशांना पर्यायी बूट पाॅलिशवाल्याकडे जावे लागत आहे. पोलीस, होमगार्ड, आरपीएफ, महाराष्ट्र सुरक्षा बल, सैनिक यांना त्यांचे बूट स्वच्छ दिसण्यासाठी सातत्याने पाॅलिश करावे लागतात. मात्र, स्थानकात बूट पाॅलिशवाला नसल्याने स्वतःच बूट पाॅलिश करतात. अनेक कार्यालयात बूट पाॅलिश करणारी मशीन देखील बसविण्यात आली आहे. परंतु, बूट पाॅलिशवाल्यांकडून येणारी चमक काही वेगळीच असते अशी प्रतिक्रिया सीएसएमटीवर कार्यरत रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानाने दिली आहे. प्रवासी रोहित कदम यांनी सांगितले की, कमी पैशात बूट चकाचक होत असल्याने नेहमी स्थानकातील बूट पाॅलिशवाल्यांकडून बूट पाॅलिश करून घेत होतो. मात्र, सीएसएमटीवर बूट पाॅलिशवाले बसत नाही. त्यामुळे पर्यायी स्थानकात जाऊन बूट पाॅलिश करावे लागत आहे.
बूट पाॅलिश कामगाराच्या आठवणी चित्रपट सृष्टीत -
हिंदी सिनेमासृष्टीचे माहेर घर म्हणजे मुंबई, या मुंबईतील रेल्वे स्थानकांवर बूट पाॅलिश करणाऱ्या कामगारांची अनेक नायकांनी मोठ्या आणि छोट्या पडद्यावर भूमिका पार पाडली आहे. बूटपाॅलिश करणाऱ्या कामगारांवर आधारित १९५४ मध्ये प्रदर्शित झालेल्या राज कपूरचा बूट पाॅलिश चित्रपट अनेकांचा मनात आजही घर करून आहे. स्वातंत्र पूर्वीचा काळात ब्रिटिश ऑफिसर्स सुद्धा रेल्वे स्थानकांवर बूट पाॅलिश करून घेत होते. कालांतराने बूट घालणाऱ्यांची संख्या वाढली. लोकल ट्रेनचा गर्दीचा प्रवास करताना अनेकांचे बूट खराब होतात. त्यामुळे बहुसंख्य लोक बूट पाॅलिश लोकलमधून उतरताच स्थानकांवर बूट पाॅलिश करून घेतात. त्यामुळे स्थानकांवरील बूट पॉलिश कामगारासोबतचे असलेले नाते आता इतिहासात जमा होणार तर नाही, असा प्रश्न नागरिकांना पडत आहे.