मुंबई - कोरोना संदर्भातील याचिकांवर मुंबई उच्च न्यायालयात आज सुनावणी करण्यात आली. मुख्य न्यायमूर्ती दत्ता ह्यांच्या खंडपीठासमोर ही सुनावणी करताना मुंबई महापालिकेला हायकोर्टाकडून कौतुकाची थाप दिली.
'मुंबईत केलंय त्याचा प्रसार मुंबईबाहेरही व्हायला हवा'
मुंबई महानगरपलिकेचं वॉर रूम हे सध्या संपूर्ण देशासाठी आदर्श आहे, असे सांगत मुंबई महापालिकेच्या कोविड मॅनेजमेंटचा आदर्श राज्यातील किती महापालिकांनी घेतला?, असा मुंबई उच्च न्यायालयाने सवाल केला. मुंबई महापालिका आयुक्तांसोबत राज्यातील सर्व पालिका आयुक्तांनी बैठक घ्यावी, जे काम आयुक्तांनी मुंबईत केलंय त्याचा प्रसार मुंबईबाहेरही व्हायला हवा, असे मुंबई उच्च न्यायालयाने निर्देश दिले. दरम्यान मुंबई महापालिकेच्या कारभार संदर्भात कौतुक होणे ही पहिली वेळ नाही, पूर्वीसुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने तसेच सर्वोच्च न्यायालयाने देखील कौतुक केले होते.
'महाराष्ट्रातील इतर महापालिका मुंबई महापालिकेएवढ्या कार्यक्षम नाहीत'
कोरोना संदर्भातील याचिकांवर मागील सुनावणीदरम्यान मुंबई उच्च न्यायालयाने, मुंबई महापालिकेची दूरदृष्टी आणि व्हिजन कौतुकास्पद असून महापालिकेचे रुग्णालये आणि त्याचे योगदान हे उदाहरण देण्यासारखे आहे. तसेच महाराष्ट्रातील इतर महापालिका मुंबई महापालिकेएवढ्या कार्यक्षम नाहीत, असे म्हणत मुंबई महापालिकेचं कौतुक करत इतर महापालिकाना मुंबई महापालिकेच्या पावलावर पाऊल टाकण्याचा सल्ला होता.